हरियाणाचे मख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सध्या एका वादात अडकले आहेत. सिरसा येथे आयोजित एका जनसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री लोकांकडून व्यसनमुक्तीबद्दलची त्यांची मतं जाणून घेत होते. यावेळी प्रश्न विचारणाऱ्या एका नागरिकावर ते संतापले. रागाच्या भरात ते या व्यक्तिला बरंच काही बोलून गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून खट्टर सध्या टीकेचे धनी बनले आहेत. या व्यक्तिने प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर खट्टर म्हणाले, “हा आम आदमी पार्टीवाला दिसतोय, याला चोप द्या आणि बाहेर हकलून द्या.”
या व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थितांना म्हणाले, व्यसन कमी करण्यासाठी आपल्या सरकारने बरंच काम केलं आहे. तुम्ही सरकारला आणखी काही सल्ले द्या. आम्ही आणखी काय काय करायला हवं हे तुम्ही सांगू शकता. यावेळी एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर त्याच्यावर संतापले आणि म्हणाले, “मित्रांनो राजकारण करू नका, हा राजकारण करणारा माणूस दिसतोय आणि हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे. याला चांगलाच चोप द्या आणि बाहेर फेकून द्या याला, घेऊन जा याला.”
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंबाबतची ती गोष्ट खटकली”, शंभूराज देसाईंनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांना…”
दरम्यान, या व्यक्तीकडे माईक नसल्याने तो काय बोलतोय हे समजू शकलं नाही. परंतु मुख्यमंत्री काय म्हणतायत हे मात्र स्पष्ट ऐकू येतंय आणि त्यांचे हावभावही दिसतायत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सुरक्षारक्षक त्या व्यक्तीला उचलून बाहेर घेऊन गेले.