देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरामार या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर भाई अमर रहें या घोषणा यावेळी देण्यात आल्या. एक लढवय्या नेता म्हणून मनोहर पर्रिकर प्रसिद्ध होते. मात्र कर्करोगाने त्यांना हरवले. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय  आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे.

रविवारी ही बातमी येताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली. मनोहर पर्रिकर हे त्यांच्या साधेपणासाठी आणि त्यांच्या पारदर्शी स्वभावासाठी प्रसिद्ध होते.

Live Blog

17:40 (IST)18 Mar 2019
मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप

मनोहर भाई अमर रहे अशा घोषणा देत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे 

17:38 (IST)18 Mar 2019
काही वेळातच मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे, काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 

15:05 (IST)18 Mar 2019
स्मृती इराणींना अश्रू अनावर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अश्रू अनावर झाले. 

15:04 (IST)18 Mar 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनही यावेळी हजर होत्या . 

14:08 (IST)18 Mar 2019
मनोहर पर्रिकर: 'सबका साथ सबका विकास'चे जनक

मनोहर पर्रिकर यांनी अल्पसंख्याक, आदिवासी आणि ओबीसींना सुखावणारे निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने ते ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचे जनक आहेत. वाचा सविस्तर>>

13:50 (IST)18 Mar 2019
पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीत दाखल

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कला अकादमीत दाखल. कला अकादमीत सर्वसामान्य नागरिकांना पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार

12:20 (IST)18 Mar 2019
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीकडे रवाना

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीकडे रवाना, कला अकादमीबाहेर पर्रिकर समर्थकांची गर्दी, कला अकादमीत संध्याकाळी चार वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

11:22 (IST)18 Mar 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला रवाना, मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आणि अंत्ययात्रेतही सामील होणार

11:17 (IST)18 Mar 2019
पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी
11:06 (IST)18 Mar 2019
रस्त्याच्या दुतर्फा समर्थकांची गर्दी

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव निवासस्थानावरुन पणजीतील भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. हे अंतर पाच किलोमीटर होते. यादरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा भाजपा समर्थकांनी गर्दी केली होती.

11:03 (IST)18 Mar 2019
नितीन गडकरींनी घेतले पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पणजीतील भाजपा मुख्यालयात

10:40 (IST)18 Mar 2019
Video: पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात
10:26 (IST)18 Mar 2019
पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात दाखल झाले असून सुमारे तासभर त्यांचे पार्थिव मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून मुख्यालय परिसरात शोकाकूल वातावरण आहे.

10:14 (IST)18 Mar 2019
पणजीतील भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

पणजी येथील भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

09:54 (IST)18 Mar 2019
पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयाच्या दिशेने रवाना

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयाच्या दिशेने रवाना...

09:29 (IST)18 Mar 2019
गोव्यातील न्यायालय आज बंद

मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गोवा उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

09:24 (IST)18 Mar 2019
संरक्षणमंत्रीपदावरील कारकिर्द

संरक्षणमंत्री असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद हल्ले करण्यात आले. त्याचे श्रेय त्यांनी संघाच्या शिकवणीला दिले होते. सध्या गाजत असलेली राफेल विमान खरेदी त्यांच्या काळातच झाली होती. संरक्षणमंत्री असतानाही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत दूर ठेवले जात असल्याने पर्रिकर खासगीत नाराजी बोलून दाखवीत असत.

08:58 (IST)18 Mar 2019
पर्रिकर यांच्या निवासस्थानाबाहेरील दृष्य
08:57 (IST)18 Mar 2019
पर्रिकर म्हणजे साधेपणा

अत्यंत साधे राहणीमान आणि अभ्यासू नेते म्हणून मनोहर पर्रिकर यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. वाचा पर्रिकरांच्या साधेपणाचे किस्से>>

08:54 (IST)18 Mar 2019
पर्रिकर यांच्या पत्नीचेही झाले होते कर्करोगानेच निधन

मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर यांचे निधनही कर्करोगानेच झाले होते. पत्नीच्या निधनानंतर पर्रिकर यांनी दोन्ही मुलांकडे लक्ष दिले. वाचा सविस्तर>>

08:39 (IST)18 Mar 2019
निष्ठा असावी पर्रिकरांसारखी: नितेश राणे

आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

08:36 (IST)18 Mar 2019
गोवा भाजपाचा चेहरा

गोव्यात १९९०च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे दोनच मुख्य पक्ष होते. भाजपाने हळूहळू या राज्यात प्रवेश करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच मनोहर पर्रिकर हा गोवा भाजपचा चेहरा होता.

08:30 (IST)18 Mar 2019
मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव सकाळी ९. ३० ते १०. ३० या वेळेत पणजी येथील भाजपाच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १०. ३० वाजता त्यांचे पार्थिव कला अकादमी येथे नेण्यात येणार आहे. कला अकादमीत सकाळी ११ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. संध्याकाळी चार वाजता कला अकादमीपासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल.  मिरामर येथे संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. 

08:25 (IST)18 Mar 2019
मनोहर पर्रिकर यांची गोव्यातील राजकीय प्रवास

मनोहर पर्रिकर १९९४ मध्ये पणजी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. जून ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी काँग्रेस सरकारला त्या काळात धारेवर धरले. २४ ऑक्टोबर २००० रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्या वेळी २७ फेब्रुवारी २००२ पर्यंत त्यांचे सरकार टिकले. नंतर ५ जून २००२ रोजी ते पुन्हा निवडून आले व मुख्यमंत्री बनले. २९ जानेवारी २००५ रोजी त्यांचे सरकार चार आमदारांनी राजीनामे दिल्याने अल्पमतात आले. नंतर काँग्रेसचे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले. २००७ मध्ये पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने पराभव केला. २०१२ मध्ये लोकप्रियतेवर आरूढ होत पर्रिकर यांनी २१ जागा जिंकल्या नंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०१४ पर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.

१३ डिसेंबर १९५५ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पर्रिकर यांची सामाजिक कारकिर्द संघाचे प्रचारक म्हणून सुरू झाली. आयआयटी, मुंबईतून त्यांनी धातुशास्त्रात अभियंता पदवी घेतल्यानंतरही ते संघाचे काम करीत राहिले. संघाशी असलेले संबंध त्यांनी कधी लपवले नाहीत. ते संघाच्या संचलनातही सहभागी होत.
Story img Loader