‘वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर द्या, अजिबात दयामाया बाळगू नका’, या संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलेल्या आदेशाचे तातडीने पालन करत सीमा सुरक्षा दलाने बुधवारी पाकिस्तानी रेंजर्सच्या आगळिकीला जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाच्या या कारवाईत पाकचे चार रेंजर्स ठार झाले. पाक रेंजर्सना अखेरीस पांढरे निशाण फडकावत शरण यावे लागले.
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सांबा क्षेत्रात पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमा सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. त्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. त्यानंतर उभय बाजूंमध्ये चकमकी सुरू होत्या. त्यातच संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानच्या आगळिकीला अजिबात भीक न घालता सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याने स्फुरण चढलेल्या सीमा सुरक्षा दलांनी बुधवारी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात पाकिस्तानचे चार रेंजर्स ठार झाले. भारतीय बाजूचा गोळीबार एवढा तीव्र होता की, ठार झालेल्या आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेह नेऊ देण्यासाठी रेंजर्सना पांढरे निशाण फडकावत गोळीबार थांबवण्याची विनंती करावी लागली. आठवडाभरात पाकिस्तानने पाचवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
संरक्षणाच्या क्षेत्रातील स्वयंसिद्धतेला चालना देणारे नवे संरक्षणसामग्री खरेदी धोरण लवकरच जारी करण्यात येणार आहे. या धोरणानुसार संरक्षणसामग्री तयार करणाऱ्या परदेशी कंपन्यांना अधिकृतपणे मध्यस्थ नेमण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

Story img Loader