सर्वोत्कृष्ट प्रशासकाचे गोडवे गाणाऱया नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच पक्षातील मनोहर पर्रिकर यांनी उघडं पाडलंय, अशी टीका कॉंग्रेसने शुक्रवारी केली. गुजरातमध्ये गोध्राकांडापश्चात उसळलेल्या दंगली हे शासनव्यवस्थाच्या अपयशाचे आणि कुचकामी प्रशासनाचेच उदाहरण असल्याचे सांगून पर्रिकर यांनी मोदी यांचा भांडाफोड केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला.
‘एनडीटीव्ही’वरील ‘वॉक द टॉक’ कार्यक्रमात ‘इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी घेतलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना पर्रिकर यांनी गोध्राकांडापश्चात उसळलेल्या दंगली हे शासनव्यवस्थेच्या अपयशाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तोच धागा पकडून कॉंग्रेसने पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. मोदी यांनी त्यावेळी दंगल रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली नाही, हेच पर्रिकर यांच्या विधानावरून स्पष्ट होत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या दंगलींना राज्य शासनच जबाबदार असल्याचे आम्ही सातत्याने सांगतो आहोत. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीसुद्धा मोदी यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्रीही तेच सांगता आहेत. त्यांना एवढ्या उशीरा उपरती झाली असली, तरी ती योग्यच असल्याचे कॉंग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले.

Story img Loader