२०१७च्या गोवा विधानसभा निवडणुकीत मनोहर पर्रिकर भाजपचे नेतृत्व करतील, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त खरे ठरू शकेल असे गोव्यातील भाजपप्रमुख विनय तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुकीत पर्रिकर भाजपचे नेतृत्व करू शकतील. पर्रिकर यांनी नेतृत्व केल्यास भाजपला निश्चितपणे वर्चस्व गाजविण्याची संधी मिळेल, असेही तेंडुलकर या वेळी म्हणाले. पर्रिकर यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत तेंडुलकर म्हणाले की, याबाबत पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, निवडणुकीला केवळ नऊ महिने शिल्लक राहिल्याने ही शक्यता नाकारता येणार नाही. पर्रिकर पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यास गोव्याच्या विकासाला हातभार लागेल आणि भाजपचे स्थान भक्कम होईल, असा विश्वासही तेंडुलकर यांनी व्यक्त केला. पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१२ मध्ये विजय मिळविला होता. मात्र, केंद्रात सुरक्षामंत्री म्हणून निवड झाल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.

Story img Loader