मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने आज देशाच्या राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला आहे. मनोहर पर्रिकर सर्वाधिक काळ गोव्याच्या राजकारणात सक्रिय असले तरी त्यांना एका राज्यापुरता मर्यादीत ठेवता येणार नाही. कारण राजकारणात त्यांनी जो साधेपणा, नैतिकता आणि नितीमत्ता जपली ती पुढच्या अनेक पिढयांसाठी आदर्श ठरणार आहे. भारताच्या राजकारणात मुख्यमंत्री असूनही पाय जमिनीवर असलेले नेते सापडणे दुर्मिळ आहे. म्हणूनच मनोहर पर्रिकरांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला आहे.
मनोहर पर्रिकर हे उत्तम रणनितीकार होते. राजकारणात समोरचा माणूस काय चाल खेळणार आहे हे त्यांनी आधीच हेरलेले असायचे. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा द्वेष करा पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. सत्तेत असले किंवा विरोधी पक्षात मनोहर पर्रिकरांचा नेहमीच गोव्याच्या राजकारणावर प्रभाव राहिला आहे. मनोहर पर्रिकरांमुळेच भाजपा गोव्यात शुन्यातून सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचू शकली.
१९८९ साली मनोहर पर्रिकर जेव्हा पूर्णवेळ गोव्याच्या राजकारणात सक्रिय झाले तेव्हा भाजपाचे राज्यात फक्त ४ हजार सदस्य होते. आज १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात भाजपाचे ४ लाख सदस्य आहेत. आज भाजपाच्या हा जो विस्तार दिसतोय त्यात पर्रिकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. मनोहर पर्रिकर यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. शालेय जीवनापासून ते संघामध्ये सक्रीय होते. आयआयटी-मुंबईमध्ये शिक्षण घेत असतानाही ते संघाशी जोडलेले होते. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जी शिस्त होती त्याचे धडे त्यांना संघाच्या शाखेवर मिळाले होते.
मनोहर पर्रिकरांसाठी राजकारणातील सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. १९८८ साली संघाने मनोहर पर्रिकरांना भाजपामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. १९९१ साली गोव्यामध्ये भाजपाचे फारसे अस्तित्व नव्हते. त्यांना उत्तर गोव्यामधून लोकसभेची निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. पहिल्याच निवडणुकीत पर्रिकर यांना २५ हजार मते मिळाली. गोव्यामध्ये जेव्हा मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा त्यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असे उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
मनोहर पर्रिकरांकडे कुठलीही गोष्ट चटकन आत्मसात करण्याचे कौशल्य होते. पहिल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून पराभव झाल्यानंतर पुढच्याच तीन वर्षात त्यांनी गोव्याची राजधानी पणजीमधून विधानसभेची निवडणूक जिंकली. १९९४ साली त्यांनी पणजीमध्ये काँग्रेसकडून विजय अक्षरक्ष: खेचून आणला. त्यावर्षी पहिल्यांदाच भाजपाने चार सदस्यांसह गोवा विधानसभेत प्रवेश केला. पणजीमधून पहिल्यांदा आमदार झालेल्या मनोहर पर्रिकरांनी नंतर गोव्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला.
मनोहर पर्रिकरांचे आक्रमक नेतृत्व, आत्मविश्वास आणि सत्ताधाऱ्यांचे घोटाळे उघड करुन त्यांना जनसामान्यांमध्ये लोकप्रियता मिळाली असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. मनोहर पर्रिकर सोशल इंजिनिअरिंगमध्ये तज्ज्ञ होते. त्यामुळेच त्यांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन गोव्यात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिस्त आणि साधेपणा ही संघाकडून मिळालेली शिकवण त्यांनी कायम जपली. मनोहर पर्रिकर यांचे उच्च शिक्षण, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याची क्षमता आणि विकासाचा दृष्टीकोन यामुळे गोव्यात भाजपाचा पक्षविस्तार होऊ शकला असे पर्रिकरांसोबत काम केलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
साधेपणा ही मनोहर पर्रिकरांची ओळख होती. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचा पेहराव, शिस्त, स्वभाव आणि झोकून देऊन काम करण्याची पद्धत यामध्ये कधीही बदल झाला नाही. त्यामुळेच ते नेहमीच सर्वसामान्यांना आपले नेते वाटले. वयाच्या ४४ व्या वर्षी २००० साली ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. महत्वाची बाब म्हणजे सरकारमध्ये कुठलाही अनुभव नसताना मनोहर पर्रिकर थेट गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
गोव्यात भाजपाला रुजवताना त्यांनी सर्वसमावेशकता सोडली नाही. गोव्यात ख्रिश्चन समुदायही मोठया प्रमाणावर राहतो. गोव्यात २७ टक्के ख्रिश्चन लोकसंख्या आहे. पर्रिकर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाचे नेतृत्व करायचे. पण त्यांनी गोव्यातील ख्रिश्चन समुदायाला पक्षाबरोबर जोडले. हे त्यांचे सर्वात मोठे राजकीय यश आहे. अल्पसंख्यांक, आदिवासी आणि ओबीसींना सुखावणारे निर्णय त्यांनी घेतले. खऱ्या अर्थाने ते ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचे जनक आहेत. पक्षाच्या मूळ विचारसरणीशी न जुळणारी भूमिका घेऊही ते संघ नेतृत्वाशी त्यांचे उत्तम संबंध होते.