पर्यटकांसाठी नंदनवन असलेल्या गोव्यात डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. अर्निबध पाटर्य़ामधून गुन्हेगारीत झालेली वाढ पाहता गोव्यात गेल्या काही वर्षांपासून नाइट क्लब आणि पाटर्य़ावर र्निबध आणले जात आहेत. त्यासाठी कुटुंबासह गोव्यात पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी अधिकाधिक उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.
बीचवर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायामुळे गोव्याची प्रतिमा खराब होत आहे, त्यामुळे आम्ही गोव्यात डान्स बारला परवानगी देणार नाही, असे पर्रिकर यांनी सांगितले. आम्ही ही साफसफाईची मोहीम राबवू, असे त्यांनी स्पष्ट केले. परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या दृष्टीने बीचवर मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी हजर राहावे असे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी सूर्यास्तानंतर पोलीस निघून जात. गोव्याला दर वर्षी देश-विदेशातील २३ लाख पर्यटक भेट देतात. २००८ मध्ये १५ वर्षीय ब्रिटिश युवतीवर बलात्कार करून खून झाल्यावर सरकारने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. रेव्ह पाटर्य़ाना त्यानंतर पायबंद घालण्यात आला. पाटर्य़ामध्ये कानठळ्या बसवणाऱ्या आवाजावर बंदी घालण्यात आली.

Story img Loader