India Mansoon Delayed : भारतीय हवामान खात्याने चार जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. पण, मान्सूनला केरळ किनारपट्टीवर दाखल होण्यासाठी आणखी २ ते ३ दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने सोमवारी ( ५ जून ) वर्तवली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना आणखी काही दिवस उन्हाची झळ सोसावी लागणार आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. ४ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण, “अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होण्यास अडथळा होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे आगमन होऊ शकते,” असं हवामान विभागातील अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
केरळात मान्सून लांबल्याने महाराष्ट्रातही उशिरा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभगाने वर्तविला आहे. राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस, तर ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.