नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांसाठी शनिवारी आयोजित केलेल्या जी २० मेजवानीला मनमोहन सिंग आणि एच.डी. देवेगौडा हे माजी पंतप्रधान प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहणार नाहीत. मात्र अनेक मुख्यमंत्री तेथे हजेरी लावण्याची शक्यता आहे. या भोजनाला माजी पंतप्रधान, तसेच विरोधी पक्ष शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिषदेतील उपस्थिती निश्चित केली आहे.
खरगेंना निमंत्रण नाही
राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या रात्रिभोजनाला काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. सरकार भारताच्या ६० टक्के लोकसंख्येच्या नेत्यांना महत्त्व देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.