कर्मचारी आणि नागरिकांना परत आणण्यासाठी काबूलमध्ये विमानांची गर्दी 

काबूल : तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहे.

न्यूझीलंडने कर्मचाऱ्यांसाठी विमान पाठवले

सौदी अरेबियाने त्यांचे सर्व दूतावास कर्मचारी माघारी नेले असून न्यूझीलंडने त्यांचे कर्मचारी व काही नागरिक यांना माघारी आणण्यासाठी विमान पाठवले आहे. सौदी अरेबियाने म्हटले आहे की, काबूल येथील दूतावासातून रविवारी सर्व कर्मचाऱ्यांना माघारी आणण्यात आले आहे. इतर देशांनीही काबूलचा ताबा तालिबानने घेतल्यामुळे त्यांचे कर्मचारी माघारी नेले आहे. न्यूझीलंड सरकारने म्हटले आहे की, ते सी १३० हक्र्युलिस लष्करी वाहतूक विमाने पाठवत असून त्यात न्यूझीलंडचे ५३ नागरिक व अफगाणिस्तानचे काही नागरिक व त्यांची कुटुंबे यांना माघारी आणले जाईल. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी सांगितले की, आतापर्यंत न्यूझीलंडला मदत करणाऱ्या ३७ अफगाणी लोकांची ओळख पटली असून त्यात इतरही काही जणांचा समावेश आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी महिनाभराची मोहीम राबवली असून त्यात विमानांना संरक्षण देण्यात येत आहे. तालिबान्यांनी लोकांना शांतपणे देश सोडून जाऊ द्यावे, असे आवाहन आर्डर्न यांनी केले आहे.

दूतावासातील १९ कर्मचारी अफगाणिस्तानबाहेर

स्टॉकहोम : अफगाणिस्तानातील स्वीडनच्या दूतावासातील १९ कर्मचाऱ्यांना काबूलहून दोहा व कतार येथे हलवण्यात आले असून, तेथून त्यांना स्वीडनला आणले जाईल, असे देशाच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅन लिंडे यांनी सोमवारी सांगितले.

आपल्या राजदूतावासातील बहुतांश कर्मचारी अफगाणिस्तानातून बाहेर पडले असल्याचे नॉर्वे व डेन्मार्कने सोमवारी यापूर्वी सांगितले होते.

नॉर्वेजियन नागरिकांच्या हितासाठी हे काम रात्रभरात करण्यात आल्याची माहिती नॉर्वेच्या परराष्ट्रमंत्री इने एरिक्सन सोएरेडे यांनी दिली, तर डेन्मार्कच्या बहुतांश राजनैतिक अधिकाऱ्यांना हलवण्यात आले असले, तरी डॅनिश नागरिकांसह इतर काही जणांना हलवले जाणे अद्याप बाकी आहे, असे त्या देशाच्या संरक्षणमंत्री ट्रायने ब्राम्सन यांनी वृत्तवाहिनीला सांगितले.

अफगाणिस्तानातील आव्हानांमध्ये, काबूलच्या गोंधळ असलेल्या विमानतळावर उतरणे हे एक आहे. याशिवाय, लोकांना विमानतळापर्यंत नेणे हेही एक कठीण काम आहे, असे ब्राम्सन म्हणाल्या.

१५०० लोकांना हलवणार; ब्रिटन

’येत्या दोन दिवसांत दीड हजारांहून अधिक लोकांना अफगाणिस्तानातून हवाईमार्गे हलवण्याची योजना सरकार आखत आहे, असे ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वाॉलेस यांनी सांगितले.

’ब्रिटिश नागरिकांना मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांसह दररोज सुमारे १ हजार लोकांना हलवणे सरकारला शक्य होईल, अशी आशा वॉलेस यांनी व्यक्त केली.

’काबूल विमानतळ संरक्षित करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांना अफगाणिस्तानातून विमानांतून बाहेर काढण्यासाठी ब्रिटन सरकारने गेल्या आठवडाअखेरीस सहाशेहून अधिक सैनिक तेथे पाठवले आहेत, असेही वॉलेस म्हणाले.

Story img Loader