इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईट्समध्ये दुजाभाव करून नेटिझन्सच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱया टेलिकॉम कंपन्यांच्या हालचालींविरोधात जागृत नेटधारकांनी सुरू केलेल्या ‘नेट न्युट्रॅलिटी’ मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत एक लाख नेटधारकांनी दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) मेल पाठवून या स्वरुपाच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध केला आहे. आंदोलनकर्ते नेटिझन्स आणि काही सेलिब्रिटींनीही या मोहीमेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ‘यूट्यूब’वरील ‘एआयबी’ या कॉमेडी शोच्या कलाकारांनीही एक व्हिडिओ प्रसारित करून नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. नेटिझन्स येत्या २४ एप्रिलपर्यंत ट्रायला मेल पाठवून यासंदर्भात आपली भूमिका मांडू शकतात.
नेट न्युट्रॅलिटीचे उद्दिष्ट काय?
– सर्व वेबसाईट्स एकसारख्याच उपलब्ध झाल्या पाहिजेत
– सर्व वेबसाईट्सचा वेग (डाऊनलोड स्पीड) एकसारखाच असला पाहिजे
– प्रत्येक वेबसाईटच्या वापरासाठी एकसारखेच शुल्क आकारले गेले पाहिजे
नेट न्युट्रॅलिटीतून काय साध्य करायचे आहे?
– काही ठरावीक वेबसाईटचा वेग (डाऊनलोड स्पीड) वाढविला जाऊ नये. वेगवेगळ्या वेबसाईट्समध्ये दुजाभाव केला जाऊ नये
– काही वेबसाईट्स शुल्कमुक्त करून इतर वेबसाईट्वर जादा शुल्क आकारले जाऊ नये
– युजर्सनी कोणती वेबसाईट पाहावी, यावर नियंत्रण ठेवले जाऊ नये
– इंटरनेट कंपन्यांना परवानाराज पद्धतीमध्ये गुंतवू नये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्यावर्षीच नेट न्युट्रॅलिटीला आपला पाठिंबा जाहीर केला. केबल किंवा दूरसंचार कंपनी यापैकी कोणीही इंटरनेटच्या वापरामध्ये द्वारपाल म्हणून काम करू नये. या दोन्ही कंपन्यांपैकी कोणीही युजर्सनी काय पाहावे आणि काय पाहू नये, यावर नियंत्रण आणू नये, असे त्यांनी म्हटले आहे.