दुमका जिल्ह्य़ात एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती झारखंडचे पोलीस प्रमुख राजीवकुमार यांनी दिली.
झारखंड सशस्त्र दल पोलीस संकुलात पाकूरचे पोलीस अधीक्षक अमरजीत बलिहार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर राजीवकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले की, नक्षलवाद्यांविरुद्ध राज्यव्यापी मोहीम अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकूर आणि दुमका जिल्हे नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आल्याने राज्यातील एकूण २४  जिल्ह्य़ांपैकी २० जिल्हे आता नक्षलग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. त्यापूर्वी राज्यपाल सय्यद अहमद यांनी बलिहार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.
पाकूरमध्ये नियुक्ती झाल्यापासून बलिहार यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर पावले उचलली होती, त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बलिहार हे दुसरे पोलीस अधीक्षक आहेत. यापूर्वी २००० मध्ये लोहारगडचे पोलीस अधीक्षक अजयकुमार सिंग यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

Story img Loader