पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी स्वत:च्या अस्तित्वासाठी प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वाईट ‘वेळ’ आलेल्या एका राजकीय पक्षाने आता दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवरून प्रचार सुरू केला आहे. राज्यात बहुसंख्य असलेल्या समाजावर साडेतीन टक्क्य़ांचा समुदाय राज्य करणार का, अशा आशयाचा प्रश्न विचारून बहुसंख्यांची मते एकवटण्याचा राजकीय डाव या पक्षाने आखला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करवून घेत कोटय़वधी युवा मतदारांना साद दिली होती. परिणामी ‘व्हच्र्युअल जगात वावरणारे’ अशी टीका सहन करणाऱ्या तरुणांनी भरभरून मतदान केले. याच सुशिक्षित ‘बहुसंख्य’ मतदारांना भुलवण्यासाठी जातीयवाद पेरणारा प्रचार सुरू करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणाऱ्या एका राजकीय पक्षाने युवकांना आकर्षित करण्यासाठी ‘ब्राह्मण विरुद्ध मराठा’ असे अभियान सुरू केले आहे. व्हॉट्स अॅपवरून सध्या याच आशयाचे एक छायाचित्र फिरत आहे. ज्यात भारतीय जनता पक्षाचे दिल्लीस्थित मराठी नेते व राज्यातील प्रमुख नेत्याच्या जातीचा उल्लेख करून पारंपरिक वेशात दाखवण्यात आले आहे. सोवळ्यात बसलेले हे दोन्ही नेते होम-हवन करीत आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या हातात नोटांची बंडले दाखवण्यात आली आहेत. एवढय़ावर न थांबता या छायाचित्रावर ‘शेटजी-भटजींच्या हातात महाराष्ट्र देणार का?’ असा समाज दुभंगणारा प्रश्न विचारण्यात आला आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅपसारख्या ‘बारा’ सोशल नेटवर्किंग साइट्सवरून सुरू असलेल्या या प्रचारावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. निव्वळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घाट घातला, परंतु त्याचा लाभ होण्याऐवजी ओबीसी मते गमावण्याची भीती काँग्रेसच्या नेत्यांना आहे. शिवाय मराठा समाजाला आरक्षण दिल्याने धनगर समाजाने एसटी संवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलन सुरू केले. एकीकडे धनगर समाज तर दुसरीकडे धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेशाला विरोध करणारे आदिवासे नेते, अशा दुहेरी कोंडीत सत्ताधारी अडकले आहेत. लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारला राज्यातील मतदारांनी अस्मान दाखवले. काँग्रेस व भाजपवगळता राज्यात दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत. त्यापैकी एक प्रादेशिक पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई असल्यासारखा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच प्रादेशिक पक्षाने नियोजनबद्ध ‘मराठा विरुद्ध ब्राह्मण’ असा तेढ निर्माण करणारा प्रचार सुरू केल्याचा दावा एका राष्ट्रीय पक्षाच्या एका बडय़ा नेत्याने केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा