महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना समाजाशी काहीही देणे-घेणे नाही. मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणाऱ्या नेत्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचे भले केले. पण अशांनी आता भ्रमात राहू नये. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आम्ही सरकार उखडून फेकू, असा इशारा देत शिव संग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी दिल्लीत मराठा आरक्षण संमेलनात दिला. गोपीनाथ मुंडे बोलघेवडे नेते असून त्यांच्या ‘कथनी व करणी’मध्ये अंतर आहे. त्यांना समज देण्याची विनंती भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांना केल्याचे मेटे यांनी सांगितले.
दिल्लीच्या मालवणकर सभागृहात झालेल्या मराठा आरक्षण संमेलनात जाट, गुज्जर समाजातील नेत्यांची उपस्थिती होती. जाट, गुज्जर समाजाचा आरक्षणासाठीच्या लढय़ात मराठा समाज सहभागी होईल; त्या बदल्यात या समाजाने आम्हाला सहकार्य करावे, अशी भावना मेटे यांनी या वेळी व्यक्त केली. मेटे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही शरसंधान केले. यशवंतराव चव्हाण निर्णय घेण्यात विलंब लावत नसत. त्याउलट विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निर्णयच घेत नाहीत. मराठा समाजातील बेरोजगार युवक, शेतकऱ्यांच्या विधवांचा आवाज पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे कान उपटण्याची गरज आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच पृथ्वीराज चव्हाण यांचे कान उपटावेत, अशी उपहासात्मक टीका मेटे यांनी केली. महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. जो आरक्षण देईल त्याचेच आम्ही समर्थन करू, अशा स्पष्ट शब्दात मेटे यांनी भाजपशी जवळीक साधण्यास तयार असल्याचे संकेत दिले. परंतु जो आरक्षणाच्या निर्णयात आडवा येईल; त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मेटे यांनी अप्रत्यक्षपणे गोपीनाथ मुंडे यांना दिला. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ मराठा समाजाच्या हाती सत्ता असल्याचा दावा खरा असला तरी केवळ पाच ते दहा टक्केसमाजातील नेतेच गब्बर झाले. उर्वरित समाजाच्या समस्या आहेत तशाच राहिल्या. दलित आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, काहींना बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे नोकऱ्या मिळतात. परंतु मराठा समाजावर अशी कुणाचीही कृपा नाही. महाराष्ट्रात मराठा मुलांना पैसे दिल्याशिवाय सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत, असे वाभाडे मेटे यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे काढले. येत्या निवडणुकीत पस्तीस टक्के मराठा समाजाला मतांसाठी कुणीही गृहीत धरू नका, असा इशारा मेटे यांनी दिला.
जाट – गुज्जर आरक्षण समर्थकांची गर्दी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत आयोजित केलेल्या संमेलनात जाट व गुज्जर आरक्षणाच्या समर्थकांची गर्दी होती. त्यामुळे मालवणकर सभागृह खचाखच भरले होते. विशेष म्हणजे या मेळाव्यास एकाही मराठा नेत्यास निमंत्रित करण्यात आले नव्हते. अखिल भारतीय जाट आरक्षण समितीचे यशपाल मलिक, गुजरातचे रामानुज पटेल, अखिलेश कटिया, कर्नलसिंह बाबडा, नांगीराम देवतिया, उत्तर प्रदेशचे मोहम्मद बनियान, महाराष्ट्रातून कांता नलावडे, मध्य प्रदेशच्या पाटीदार समाजाचे अध्यक्ष दीनदयाळ पाटीदार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी तीनशे कार्यकर्ते जमा झाले होते.