राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विरोधकांकडूनही उमेदवार देण्यास उशीर झाल्याने भाजपा हा प्रयत्न करताना दिसत आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. ममता बॅनर्जींनी सांगितलं की, शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार असतील, तर सर्व विरोधी पक्षाचं यावर एकमत आहे. पण पवारांनी नकार दिल्यानं आता नव्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे.
मात्र आता राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर २०२४ साली मराठी माणूसच पंतप्रधान पदी बसणार असा विश्वास शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी तो भाजपाचा किंवा महाविकास आघाडीचा असेल असे म्हटल्याने नवीन चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
दिपाली सय्यद यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत. शरद पवार यांच्यामुळे पंतप्रधान पदावर २०२४ मध्ये मराठी नेतृत्वच बसणार मग पक्ष भाजपा असो या मविआ. जय महाराष्ट्र,” असे दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
“शरद पवारांनी ही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती. कदाचित शरद पवारांच्या बाजूने पारडे झुकले असते. आजही भाजपाकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी जे बहुमत लागते ते नाही आहे. शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर अनेक राज्यातून मतदान झाली असते. भाजपाची मदार खासदारांच्या मतांवर आहे आणि त्यांचे मूल्य सर्वाधिक असते. भाजपा फारतर १०० मतांनी पुढे असेल त्यामुळे सामना बरोबरीचा आहे,” असे संजय राऊत म्हणाले.