संत साहित्य हे साहित्यातील मुख्य प्रवाह असल्याची भूमिका ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मांडली. पंजाबमध्ये पहिल्यांदा होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवार उदघाटन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल उपस्थित होते. सुमारे तासाभराच्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सदानंद मोरे यांनी संत साहित्य, संत नामदेवांचे पंजाबमधील कार्य आणि संतसाहित्याचा समाजमनावरील प्रभाव यावर विचारमंथन केले. ते म्हणाले, “वीरवृत्ती आणि संतवृत्ती या दोन्ही गोष्टी पंजाब आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये आहेत. घुमानमधील संमेलन इतर सर्व संमेलनांपेक्षा वेगळे आहे. नामदेवरायांमुळे उत्तर भारतात धर्म शिक्षणाला सुरूवात झाली. तसेच ‘गुरूग्रंथ साहिब’मध्ये विठ्ठलाचा उल्लेख देखील नामदेवरायांमुळेच झाला. त्यामुळे या संमेलनासाठी घुमानसारखे दुसरे सुयोग्य ठिकाणच नव्हते.”
डाव्या चळवळीतील लोकांनीही संत साहित्याशी लोकांना जोडून घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, चांगल्या साहित्यासाठी संतपरंपरेच्या जवळ गेले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विवेकाचाही जागर होतो, असेही त्यांनी सांगितले. हिंदूस्थान हा देशातील सर्वांचा ही भूमिका पहिल्यांदा मराठ्यांनी मांडली. राजकारण आणि धर्म हे या देशात एकमेकांसमवेत चालत असले तरी राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही अशी त्यांची भूमिका असल्याचे मोरे म्हणाले. मराठी संस्कृतीला ओळख देणाऱया गोष्टींपैकी एक साहित्यसंमेलन असल्याचे सांगून ते म्हणाले, साहित्य संमेलन हे मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे. मराठी संस्कृतीमध्ये ज्ञान आणि उत्सव यांत भेद आहे असे मानले जात नाही. ज्ञानात आणि उत्सवामध्ये भेद असूही नये ही नामदेवांची परंपरा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी ही ज्ञान भाषेसह विज्ञान भाषा होणे गरजेचे- शरद पवार</strong>
मराठी भाषा ही ज्ञान भाषा तर आहेच पण, मराठी भाषा विज्ञान भाषा कशी होईल यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्य संमेलनातील आपल्या भाषणात म्हटले. मराठी भाषेबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे आणि डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे हे मराठी भाषकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, “यंदा साहित्य संमेलन स्थळाची निवड आणि अध्यक्षांची निवड एकदम सार्थ आहे. संथ तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्यातील गाढे अभ्यासक असलेले सदानंद मोरे यांची निवड अध्यक्षपदी होणे सुयोग्य आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांचे वेगळे नाते आहे. दोन्ही राज्यांतील नागरिकांना शेतीबद्दल प्रचंड आस्था असून दोन्ही राज्यांतील शूर जवान सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जीव द्यायला तयार असतात या संमेलनाच्या निमित्ताने दोन्ही राज्यांतील लोक एकमेकांशी जोडले जातील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

समृद्धता आणि संपन्नता केवळ पैशातून येत नाही- नितिन गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, समृद्धता आणि संपन्नता केवळ पैशातून येत नाही. संत साहित्याच्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर संतांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या विचारातून अनेकांनी जीवनमार्ग अनुसरला आहे. संत नामदेवांबद्दल महाराष्ट्रातील लोकांना जेवढे प्रेम आहे तेवढेच पंजाबमधील लोकांनाही आहे. नामदेव हे राष्ट्रीय संत पुरूष होते. सांस्कृतिक जीवनदीशा देण्याचे काम या संमेलनातून होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नागपूरात पंजाबी साहित्य संमेलन
पंजाब विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्याची घोषणा यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली. तसेच यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती बादल यांनी डॉ. सदानंद मोरे यांच्याजवळ केली. सोबत नागपूरात पंजाबी साहित्य संमेलन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Story img Loader