छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : संमेलनाची दोन वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटने, मंचावरील लांबलेली रटाळ भाषणे, महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचलेल्या मराठी जनांच्या अनपेक्षित गर्दीने आयोजकांची तारांबळ उडाली होती. यामुळे संमेलनाची इतिहासात वाईट नोंद होईल का, अशी शंका व्यक्त होत असतानाच संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र चित्र बदलले. शनिवारी सर्व सत्रांना झालेल्या गर्दीने राजकारण्यांनी पळवलेल्या संमेलनाचे जणू ‘पुनरागमन’च झाले.
महाराष्ट्रातून आणि काही प्रमाणात उत्तर भारतातूनही मराठी जनांचे अनेक जथे दिल्लीत दाखल झाले. आवडत्या साहित्यिकांची गाठभेट व्हावी, पुस्तकांची खरेदी करता यावी, भाषेच्या या सर्वात मोठ्या उत्सवाचा आनंद लुटता यावा, या अपेक्षेने ही मंडळी संमेलनाला आली. परंतु, पहिल्या दिवशीच्या राजकीय गोंधळामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. शनिवारी सकाळपासून संमेनलात गर्दी वाढायला लागली. वक्ते पोहोचायच्या आधी श्रोते मंडपात दाखल व्हायला लागल्याने ही केवळ सेल्फीकेंद्रीत गर्दी नाही, असे लक्षात आल्यावर आयोजकांवरही अनपेक्षित दबाव वाढला व सत्रे वेळेत सुरू करण्याच्या सूचना गेल्या. विविध विषयांवरील परिसंवादाची चर्चा गांभीर्याने ऐकली गेली.
तिकडे ग्रंथदालनातही वर्दळ वाढली. राजकीय वलयाच्या प्रभावात गुरफटलेल्या आयोजकांना साहित्य रसिकांनी त्यांच्या उत्साहामुळे पुन्हा संमेलनाकडे लक्ष घालण्यास बाध्य केले, इतकेच नव्हे तर अप्रत्यक्षपणे संमेलनच आपल्या हातात घेऊन हे संमेलन कशासाठी आयोजित केले आहे, याची आपल्या कृतीतून जाणीवही करून दिली.
कालची काही सत्रे वेळेच्या दृष्टीने थोडी विस्कळीत झाल्याने आम्हीही दुसऱ्या दिवसाबाबत चिंतित होतो. परंतु, संमेलनातील गर्दी बघून आमचा उत्साह वाढला. गर्दी वाढली तरी एकाही साहित्यप्रेमीची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.–संजय नहार, संमेलन निमंत्रक, सरहद संस्था
शनिवारी अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि खरेदीही केली. दिल्लीत असलेल्या मराठी माणसांच्या लोकसंख्येचा विचार करता फार मोठी पुस्तक विक्री होईल अशी अपेक्षा नाही. पण, ऐतिहासिक आणि संगीतविषयक पुस्तकांना मागणी आहे. – अनिल कुलकर्णी, अनुबंध प्रकाशन
कालचा गोंधळ विसरून लोक आज मोठ्या उत्साहाने संमेलनात परतले. निखळ कवीकट्ट्यापासून गंभीर परिसंवादापर्यंत सर्वच मंडपांमध्ये अनपेक्षित गर्दी होती. याचे श्रेय याच गर्दीला अर्थात दिल्लीत आलेल्या मराठी जणांना आहे. – दादा गोरे, कार्यवाहक, मराठवाडा साहित्य परिषद
ग्रंथप्रदर्शनाला शनिवारी चांगला प्रतिसाद लाभला. अनेकांनी पुस्तके हाताळली. काहींनी खरेदी केली. शनिवारी गर्दी चांगली होती. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असला तरी रविवारी प्रदर्शनाला गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. – संतोष तांबोळी, नंदिनी पब्लिशिंग हाऊस