Marathi Sahitya Sammelan 2025 : लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. त्यानंतर त्यांनी लोकसाहित्य आणि मराठी भाषेबाबत भाषण केलं. या भाषणात त्यांनी विविध उदाहरणं देऊन भाषा समृद्ध होणं किती महत्त्वाचं असतं ते सांगितलं.

काय म्हणाल्या तारा भवाळकर?

“साहित्य संमेलन सुरु झालं त्यावेळेस काही ठराविक वर्गातल्या लोकांचं हे साहित्य संमेलन होतं, वर्ग हा शब्द अर्थशास्त्रीय परिभाषेतला वापरला आहे. महात्मा फुले यांनी त्या संमेलनाला घालमोड्या दादांचं संमेलन आहे असं त्यावेळी म्हटलं होतं. घालमोडे दादा हा पुन्हा बोलीभाषेतला शब्द. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा होता की हे तथाकथित उच्चवर्णीयांचं संमेलन आहे आणि आमच्यासारख्या श्रमकऱ्यांना यामध्ये स्थान आहे की नाही याची शंका यावी. त्यामुळे महात्मा फुलेंनी संमेलनावर टीका केली होती. आज व्याप्ती विस्तारते आहे.”

सुशिक्षित कुणाला म्हणायचं?

“इंग्रजोत्तर काळात असा एक समज झाला आहे की सुशिक्षित कुणाला म्हणायचं ? तर ज्याला लिहिता वाचता येतं तो सुशिक्षित. बायका आणि श्रमकरी वर्गातले लोक इंग्रजोत्तर काळात ज्यावेळी सार्वजनिक शाळा, महाविद्यालयं निर्माण झाली तेव्हापासून माणसं शिकायला लागली. श्रमकरी वर्ग, स्त्रिया शिकू लागले. तोपर्यंत सगळे अडाणी आहेत असा एक समज आहे. आजही जर कुणी शाळेत जात नसेल तर विशेषतः बायका औपचारिक शिक्षणक घेतलेल्या नसतील तर त्यांचा उल्लेख अडाणी असा केला जातो. लोकसंस्कृतीतल्या ओव्या ज्यावेळी मी सांगते किंवा आमचे सहकारी जेव्हा म्हणतात की त्या अडाणी असूनही त्यांनी इतकं चांगलं लिहिलं. त्यावेळेस मला त्यांना अडाणी म्हणणाऱ्यांच्या अडाणीपणाचा फार राग येतो. कारण केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शहाणपण असं नाही. साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा उपयोग नाही.

बहिणाबाई चौधरींची ओवी काय सांगते?

लोक परंपरेतील एक ओवी सांगते कारण मला त्या ओव्यांनीच जास्त शिकवलं आहे. तथाकथित अडाणी संत स्त्रियांनी मला पुस्तकांपेक्षा जास्त शिकवलं आहे. आमच्या बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानूस राहतो रे येडा जरा, केव्हा तर पुस्तकं वाचून, छापीस नी होतो कोरा कागद शहाना. छापलेले कागद असतील तर कोरा कागदही शहाणा होतो. पण छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच याची खात्री नसते. याचा अनुभव आपण घेत आहोत. या अपसमजातून आधी आपण बाहेर आलं पाहिजे” असं स्पष्ट मत डॉ. तारा भवाळकर यांनी मांडलं.

लोक साहित्य आणि संस्कृती यांच्याविषयी समाजात दोन प्रमुख अपसमज-तारा भवाळकर

पुढे तारा भवाळकर म्हणाल्या, “माझी ओळख करुन देताना सगळेजण लोक संस्कृतीच्या अभ्यासक, लोक साहित्याच्या अभ्यासक अशी करुन देतात. त्याबद्दल दोन अपसमज आहेत. पहिला म्हणजे लोकसंस्कृती म्हणजे जुनी, तर दुसरा अपसमज म्हणजे लोकसंस्कृती म्हणजे ग्रामीण भागातली. जणू काही लोकसंस्कृती आणि साहित्य यांचा शहरी नागर मंडळीशी संबंधच नाही. पण ही वस्तुस्थिती नाही. तसंच लोक साहित्याकडे बघणारा आणखी एक समाज असतो ज्यांना हे वाटत असतं की जे काही सगळं चांगलं आहे ते लोक साहित्यातच आहे. मी त्याला उमाळा संप्रदाय असं म्हणते. सगळं आमच्या जुन्या साहित्यात सांगितलं आहे हे समज असणं हा नुसता उमाळा असतो. बाकी खरं काही नसतं.” असं तारा भवाळकर म्हणाल्या.

Story img Loader