लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : तब्बल सात दशकांनी राजधानी दिल्लीमध्ये आज, शुक्रवारपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाने अनपेक्षित उदारता दाखवणे सुरू केल्यापासून संमेलनातील राज्यकर्त्यांचा वावर लक्ष वेधून घेत असला तरी साहित्य महामंडळाला नेत्यांच्या उपस्थितीची अपरिहार्यता टाळता आलेली नाही. याचे पडसाद गुरुवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत उमटले असताना आता संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यावर काही भाष्य करतात का, याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केवळ राजकीय कारणामुळे संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उद्घाटने होणार आहेत. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. याशिवाय तीन दिवसांत होणारी विविध सत्रे आणि समारोप समारंभामध्ये ही राजकीय सावली अधिक गडद होत जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित संमेलनात उपस्थिती नोंदविणार आहेत. या राजकीय अतिक्रमणामुळे महामंडळाच्या घटक संस्थांमध्येही नाराजी आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत पुण्याची महाराष्ट्र परिषद, मराठवाडा साहित्य परिषद आणि बृहन् महाराष्ट्रातील काही सदस्यांनी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना याबाबत जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. संमेलन महामंडळाच्या हातून निसटत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही राजकीय अतिक्रमण थांबवण्यासाठी काहीच का केले नाही? दिल्लीत झळकणाऱ्या सरकारी जाहिरातींसाठी सरकारने राजकीय महामंडळाची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न तांबे यांना विचारले गेले. त्यावर शासनाला विचारणा करण्यात येईल, असे उत्तर तांबे यांनी दिल्याचे समजते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच संमेलन असल्याने साहित्य रसिकांमध्ये त्याचे विशेष आकर्षण आहे. संमेलनाला तीन हजारांपेक्षा जास्त उपस्थितीची शक्यता असून यात सुमारे दीड हजार साहित्यिक व प्रकाशनाशी संबंधित व्यक्ती असतील. ‘सरहद’ संस्थेने आयोजित केलेल्या या संमेलनात सुमारे १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

Story img Loader