Marathi to Get Classical Language Status : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!”

हे ही वाचा >> मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?

“लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू ग्रंथांच्या आधारावर मराठी भाषा अभिजात असल्याचं सिद्ध करणं सोपं झालं”

फडणवीस यांनी म्हटलं आहे की “मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहेत. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला”.

हे ही वाचा >> २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’

उपमुख्यमंत्री म्हणाले, “नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”.

हे ही वाचा >> विश्लेषण : ‘अभिजात दर्जा’ हवाच; तो का?

आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता. त्यात आता मराठी, बंगाली, पाली, प्राकृत व आसामी भाषेचा समावेश झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi to get classical language status as modi cabinet approves conferring proposal asc