इंदूरमध्ये मोडी लिपी प्रशिक्षण
(मनोहर धडफळे)
महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच्या वतीने ‘मोडी लिपी आणि तिची गरज व सद्यस्थिती’ याची जाणीव करून देण्यासाठी मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या वतीने श्रीयुत कृष्णाजी म्हात्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
संपूर्ण भारतात स्वातंत्र्यापूर्वी १०० वर्षे मराठय़ांचेच साम्राज्य होते. त्यांच्या राज्यात पूर्वापार चालत आलेल्या मोडी लिपीतच सर्व कारभार चालत होता. त्यातील बरेचसे दस्तऐवज, करारनामे, आज्ञापत्रे, भू-अभिलेख इ. मोडी लिपीतच आहेत. इ. सन १९५० नंतर मोडी लिपी मोडीतच निघाल्याने ती सर्व कागदपत्रे तशीच पडून आहेत. मोडी लिपीचे जाणकार फारच मोजके असल्याने ती कागदपत्रे अद्यापि वाचली गेली नाहीत. ती वाचली जावीत अन् मराठय़ांच्या देदीप्यमान कारकीर्दीचे आकलन आजच्या पिढीस व्हावे ही काळाची गरज आहे, असे म्हात्रे यांनी निक्षून सांगितले. याप्रसंगी पुरातन विभाग भोपाळचे अधिकारी सय्यद नईमुद्दीन हेही उपस्थित होते. वस्तुस्थितीची जाणीव करून देताना ते म्हणाले की, बऱ्याचशा न्यायालयीन प्रकरणांत प्रमाण म्हणून मोडी लिपीत असलेले दस्तऐवज प्रस्तुत करण्यात येतात. देवनागरीत लिप्यंतर करून घेण्यासाठी मुंबईस पाठवावे लागतात. यात बराच कालावधी जातो. मध्य प्रदेशातल्या प्रमुख शहरांत मोडी लिपीचे प्रशिक्षण द्यायची व्यवस्था झाल्यास सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. नईमुद्दीन यांचे हे मत प्रमाण मानून महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरने अलीकडेच १० दिवस रोज दोन तास मोडी लिपी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. कृष्णाजी म्हात्रे यांनी सहज आकलन होईल अशा रीतीने विस्तारपूर्वक माहिती पुरवून हे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचे साहाय्यक राघव माळी यांनी इतर माहिती पुरविली. या प्रशिक्षण वर्गाचा वय वर्षे ३० ते ८५ या वयोगटातल्या एकूण ३० मंडळींनी लाभ घेतला.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन येथील पार्षद अर्चना चितळे यांनी केले. शासकीय दृष्टिकोनातून हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे त्यांनी सांगितले. समापनाच्या दिवशी खनिज निगमचे उपाध्यक्ष गोविंदजी मालू आणि नजूल तहसीलदार पूर्णिमाजी सिंधी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना या आयोजनाबद्दल महाराष्ट्र साहित्य सभेचे कौतुक केले. स्थानीय प्रशासनाकडून या उपक्रमास हवा तो सहयोग देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा