शांतिनिकेतन : नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी शांतिनिकेतनमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शहरातील बुद्धिवादी आणि स्थानिकांनी सहभाग घेतला. विश्वभारती विद्यापीठाने अमर्त्य सेन यांच्यावर जमिनीवर आक्रमण करण्याचा आरोप ठेवून त्यांना ती जमीन रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे वाद उद्भवला आहे. या प्रकरणी सेन यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलकांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची गाणी गायली, कविता म्हटल्या आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधील काही भागांचा अभिनय केला. आंदोलक शुक्रवारी सकाळी विश्वभारतीच्या आवारातील शिक्षण भवनाजवळ जमा झाले. तिथे त्यांनी सेन यांच्या ‘प्रतिची’ या घराबाहेर मानवी साखळी उभारली आणि गुरुदेवांची गाणी गात मिरवणूक काढली. साहित्यिक आणि विश्वभारतीचे माजी अध्यापक स्वपन कुमार घोष यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

प्रा. अमर्त्य सेन यांना गप्प करण्यासाठी विश्वभारतीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा वारंवार अपमान  केला जात आहे तसेच त्यांना शारीरिक हल्ल्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे. प्रा. सेन यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे आम्हाला त्रास होत आहे आणि आम्हाला चिंता वाटत आहे असे मोर्चात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते अरिंदम बिस्वास म्हणाले.

कलकत्ता उच्च न्यायालयाकडून १० मेपर्यंत दिलासा विश्वभारतीने अमर्त्य सेन यांना जमीन रिकामी करण्यासाठी बजावलेल्या नोटिशीला कलकत्ता उच्च न्यायालयाने १० मेपर्यंत स्थगिती दिली आहे. सेन यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे, त्यावर येत्या बुधवारी सुनावणी घेण्यात यावी, तोपर्यंत नोटिशीची अंमलबजावणी करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले.  आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March in santiniketan in support of amartya sen zws