Kolkata Nabanna Rally : कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पश्चिम बंग छात्र समाजाच्या विद्यार्थ्यांनी आज कोलकाता कॉलेज स्क्वेअर येथून राज्य सचिवालय नबान्नाच्या दिशेने मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला बेकायदा मोर्चा म्हणत कोलकाता पोलिसांनी आदोलकांवर पाण्याचा फवारा मारत अश्रूधूराच्या नळकांड्याचा वापर केला. आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता ‘मार्च टू नबन्ना’ आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर दगडफेक केली. विद्यार्थी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने दावा केला आहे की, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. ‘मार्च टू नबन्ना’करता पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती. तसंच, या मोर्चादरम्यान हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला होता. कोलकाता पोलिसांनी नबान्नाच्या चहूबाजूंनी सुरक्षित केलं आहे. तसंच, आंदोलकांना कोणत्याही मार्गाने सचिवालयाकडे जाण्यापासून रोखलं. याकरता जवळपास ६ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडू नये म्हणून ते जमिनीत ग्रीस करण्यात आले आहेत.

आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले

आज सकाळी आंदोलकांचा एक गट कॉलेज चौकात जमला आणि त्यांनी नबान्नाकडे कूच केली. बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि नागरिक मंच सहभागी झाले आहेत. आंदोलक त्यांच्या मार्गातील बॅरिकेड्स हलवत असल्याचे दृश्य दृश्यांमध्ये दिसून आले. दुपारी १ च्या सुमारास हावडा आणि कोलकाता येथील विविध भागांतून निदर्शकांनी भारताचा झेंडा फडकावत सरकारविरोधी घोषणाबाजी करत राज्य सचिवालय ‘नबान्ना’कडे मोर्चा काढला.

हेही वाचा >> Kolkata Rape and Murder : ‘संजय रॉयने डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याआधी गर्लफ्रेंडला मागितले न्यूड फोटो आणि..’, काय माहिती आली समोर?

हावडा येथील संत्रागाची येथे आंदोलकांनी बॅरिकोड तोडला त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचाही वापर केला. दरम्यान, आंदोलक संत्रागाछी रेल्वे स्थानकावर गेले आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल पोलिसांवर दगडफेक केली.

कोलकाता बाजूला हेस्टिंग्जजवळ दुसऱ्या हुगळी ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्यासागर सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर, आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याठिकाणीही पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा अवलंब केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March to nabbana student rally turns violent as kolkata police lathicharge sgk