प्रत्येक देशात काही समस्या असतात. मात्र, त्यामुळे आमच्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे अभिनेते अनुपम खेर यांनी ठणकावून सांगितले. आम्ही निधर्मीवादी आहोत, स्युडो सेक्युलरिझम किंवा मनात एखाद्याबद्दल अढी ठेवून त्याच्यावर दोषारोप करण्यावर आमचा विश्वास नसल्याचे खेर यांनी म्हटले. पुरस्कार वापसीच्या विरोधात दिल्लीत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारत असहिष्णू असल्याचा आरोप करणाऱ्यांना आपला देश सहिष्णू आहे, हे आम्हाला सांगायचे आहे. भारत हा निधर्मीवाद देश असून कोणालाही देशाची निंदानालस्ती करण्याच हक्क नाही. देशात असहिष्णू वातावरण असेल तर पुरस्कार परत करणाऱ्यांनी प्रथम पंतप्रधानांकडे दाद मागितली पाहिजे होती. मात्र, त्याऐवजी थेट पुरस्कार परत करणे, योग्य नसल्याचेही अनुपम खेर यांनी सांगितले.
देशातील वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून कलाकार आणि लेखकांच्या पुरस्कार वापसीचा निषेध करण्यासाठी शनिवारी दिल्लीत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपती भवनावर काढण्यात आलेल्या या मोर्चात दिग्दर्शक मधूर भांडारकर, प्रियदर्शन यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेकजण सहभागी झाले आहेत. अभिनेते परेश रावल यांनीदेखील या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. देशात असहिष्णू वातावरण असल्याचे सांगत पुरस्कार परत करणाऱ्यांचे डोळे उघडावेत, यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. भारत सहिष्णू आहे, हा संदेश आम्हाला या मोर्चाद्वारे द्यायचा असल्याचे परेश रावल यांनी सांगितले. दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयापासून सुरू होणारा हा मोर्चा जनपथ मार्गावरून राष्ट्रपती भवनाजवळ पोहचणार आहे.