पीटीआय, पॅरिस

फ्रान्समधील अतिउजव्या नेत्या मेरिन ल पेन यांना कोणतीही निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे. युरोपीय महासंघाच्या सदस्य असताना त्यांनी व त्यांच्या पक्षातील अन्य आठ जणांनी महासंघाकडून आलेल्या निधीचा वापर पक्षासाठी केल्याचा आरोप सोमवारी न्यायालयात सिद्ध झाला. त्यानंतर ही शिक्षा ठोठावण्यात आल्याने राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांच्या कडव्या प्रतिस्पर्धी असलेल्या ल पेन यांचे राजकीय भवितव्य अधांतरी झाल्याचे मानले जात आहे.

सोमवारी सकाळी सुनावणीवेळी न्यायालयात पुढच्या रांगेत बसलेल्या ल पेन यांनी दोषी सिद्ध झाल्याचे न्यायाधीशांनी सांगितल्यानंतर फारशी प्रतिक्रयिा दिली नाही. मात्र त्यांना निवडणूक लढण्यावर बंदी घातल्यानंतर त्या तडकाफडकी उठून निघून गेल्या. न्यायालयाची इमारत सोडून जाताना त्यांनी माध्यमांशी बोलणेही टाळले. त्यानंतरही न्यायाधीशांनी शिक्षेची सुनावणी सुरूच ठेवली. सदर गुन्ह्यासाठी ल पेन आणि त्यांच्या सहआरोपींना १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र या निकालास त्यांनी आव्हान दिले तर वरिष्ठ न्यायालयात त्यावर सुनावणी होईल. ल पेन यांना नेमका किती काळ निवडणुकीपासून दूर राहावे लागेल, हे न्यायालयाने स्पष्ट केले नसले आणि या निकालास आव्हान देण्याची त्यांना मुभा असली, तरीही २०२७ मधील अध्यक्षीय निवडणूक त्यांना निश्चितपणे लढता येणार नसल्याचे मानले जात आहे.

राजकीय ‘मृत्यू’?

ल पेन आणि त्यांचा ‘नॅशनल रॅली’ हा पक्ष माक्राँ यांच्या पक्षाला कडवी टक्कर देत होता. २०१७ आणि २२ या दोन्ही अध्यक्षीय निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी माक्राँ यांच्या पक्षाचे मताधिक्य सातत्याने घटले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे पक्षाच्या नेत्या ल पेन यांच्यासह अनेक नेत्यांना निवडणूक लढता येणार नसल्यामुळे हा त्यांचा राजकीय अंत मानला जाऊ लागला आहे.