एपी, टोरांटो
कॅनडाचे नियोजित पंतप्रधान म्हणून मार्क कार्नी यांची रविवारी निवड झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेविरोधात आवाज उठवताना, ‘‘कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग होऊ शकत नाही,’’ असे स्पष्ट केले. त्याबरोबरच ५९ वर्षीय कार्नी यांनी यापूर्वीच भारताबरोबरचे संबंध सुधारण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

टोरांटोमध्ये रविवारी कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पार्टीच्या अधिवेशनात मार्क कार्नी यांना ८५.९ टक्के मते मिळाली. विद्यामान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ७ जानेवारीला राजीनामा दिल्यानंतर त्यांचा वारसदार निवडण्यासाठी पक्षाने हे अधिवेशन आयोजित केले होते. पक्षाने निवडीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर कार्नी यांनी अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाचाही सामना यशस्वीपणे करू, असे जाहीर केले.

अमेरिकेवर टीका करताना कार्नी म्हणाले, ‘‘अमेरिकेला आपली संसाधने, पाणी, जमीन आपला देशही हवा आहे. याचा विचार करा. ते यशस्वी झाले, तर आपली जीवनपद्धती ते बदलतील. अमेरिकेत आरोग्यसेवा हा सर्वांत मोठा व्यवसाय आहे. आपल्या देशात तो हक्क आहे. अमेरिका म्हणजे कॅनडा नव्हे. कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग होऊ शकत नाही.’’ अमेरिकेच्या करधोरणावर ते म्हणाले, ‘आम्हाला हा संघर्ष नको आहे. पण, कुणी तो लादत असेल, तर त्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत. यात कॅनडाचाच विजय असेल. अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून सध्या तितकेच कर कॅनडाने अमेरिकेवर लावले आहेत. ते तसेच राहतील.’

‘भारताबरोबरील संबंध सुधारणार’

आपण पंतप्रधानपदावर आल्यास भारताबरोबरील संबंध सुधारण्यावर भर देणार आहेत असे गेल्या मंगळवारी कार्नी यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, ‘‘समविचारी देशांबरोबर कॅनडा व्यापारी संबंध वाढवेल. भारताबरोबर संबंध सुधारण्याचीही संधी आहे. मी पंतप्रधान झालो, तर त्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करीन.’’ ट्रूडो यांच्या काळात भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले होते.

समस्या सोडविण्याचा अनुभव

कार्नी हे २००८ ते २०१३ या काळात ‘बँक ऑफ कॅनडा’चे प्रमुख होते आणि ‘बँक ऑफ इंग्लंड’मध्ये २०१३ ते २०२० या काळात होते. २००८ मधील मंदी, ‘ब्रेक्झिट’चा मुद्दा अशा गुंतागुंतीच्या समस्या हाताळण्याचा त्यांना अनुभव आहे. कार्नी यांनी ‘गोल्डमन सॅक’मध्येदेखील काम केले आहे. २००३मध्ये ‘बँक ऑफ कॅनडा’ येथे रुजू होण्यापूर्वी त्यांनी लंडन, टोकियो, न्यूयॉर्क, टोरांटो येथे १३ वर्षे त्यांनी काम केले आहे. २०२० मध्ये संयुक्त राष्ट्रांत हवामान बदल आणि आर्थिक कारभारावरील विशेष दूत म्हणून काम करीत आहेत.

Story img Loader