आत्तापर्यंत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० मध्ये असणारा फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग २०१५नंतर पहिल्यांदाच पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे फेसबुकच्या युजर्सची घटणारी संख्या! बुधवारी फेसबुककडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकच्या युजर्सच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीमध्ये ही घट मोठी असून हा आकडा गेल्या १७ वर्षांतला सर्वाधिक आहे. त्याचा परिणाम थेट फेसबुकच्या शेअर्सवर झाला असून खुद्द मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाचे शेअर्स घसरू लागले होते. पहिल्या तासाभरातच फेसबुकच्या शेअर्सच्या किंमती २० ते २२ टक्क्यांनी घटल्या होत्या. त्यापाठोपाठ संध्याकाळपर्यंत हे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खाली आले. याचा फटका मार्क झुकरबर्गसोबतच मेटाच्या इतर प्रमुख सदस्यांना देखील बसला आहे.

झुकरबर्गची संपत्ती आता ९२ अब्ज डॉलर्स!

मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्गची वैयक्तिक संपत्ती या फटक्यानंतर १२० अब्ज डॉलर्सवरून थेट ९२ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्गला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका बसला असून तू सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून पहिल्या दहामधून बाहेर गेला आहे.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी एलॉन मस्कनं नोव्हेंबरमध्ये ट्विटरवर त्याच्या कंपनीचे १० टक्के शेअर्स विकायला हवेत का? असा पोल घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची संपत्ती तब्बल ३५ अब्ज डॉलर्सने घटली होती. आजपर्यंत एका दिवसात वैयक्तिक संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घट ठरली आहे.

मेटाचे सहसंस्थापक डस्टिन मोस्कोविट्झ यांना देखील ३ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. डस्टिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ७९व्या स्थानावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ एड्युअर्डो सॅव्हेरिन यांना देखील ४ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. सॅव्हेरिन यांची संपत्ती १७.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

लोकसत्ता विश्लेषण : १७ वर्षात पहिल्यांदाच फेसबुकच्या फॉलोअर्समध्ये घट; मेटावर काय परिणाम होणार?

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, फेसबुकच्या दैनंदिन सक्रिय यूजर्समध्ये सुमारे अर्धा दशलक्ष घट झाली. जुलै-सप्टेंबर दरम्यान यूजर्सची संख्या १.९३० अब्ज वरून १.९२९ अब्ज झाली आहे. हे नुकसान प्रामुख्याने आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील यूजरबेसमुळे झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मेटाने अपेक्षेपेक्षा अॅपलच्या गोपनीयतेतील बदल आणि टीक टॉक सारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून यूजर्ससाठी वाढलेली स्पर्धा यासाठी कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg lost 31 billion dollers as facebook users goes down shares collapses pmw