सध्याच्या जमान्यात संवादाचे लोकप्रिय साधन म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेसबुकचा कारभार नक्की कसा आणि कुठून चालतो, याबद्दल आपल्यापैकी अनेकांच्या मनात कुतूहल असेल. सिलिकॉन व्हॅलीतील मेलानो पार्क येथे असणाऱ्या फेसबुकच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही लवकरच भेट देणार आहेत. त्यामुळे या कार्यालयाबाबत भारतीयांच्या मनात असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे. फेसबुकचे हे मुख्यालय नक्की कसे दिसते, तेथील वातावरण कसे आहे, हे पाहण्याची संधी खुद्द मार्क झकरबर्गनेच उपलब्ध करून दिली आहे. मार्क झकरबर्गने आजच आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. फेसबुकच्या नव्या ‘लाईव्ह व्हिडिओ’ फंक्शनचा वापर करुन कॅलिफोर्नियातील फेसबुकचे नवे मुख्यालय दाखविण्यात आले आहे. फेसबुकने या वर्षाच्या सुरूवातीलाच तब्बल ४०,००० चौरस फुट क्षेत्रावर पसरलेले हे कार्यालय विकत घेतले होते. विस्तृत जागेत असलेल्या या कार्यालयात समानता जपण्यासाठी मार्क झकरबर्गसह सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकाचप्रकारची आसनव्यवस्था तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मुख्यालयात कॉन्फरन्स रूम वगळता एकही स्वतंत्र अशी केबिन नाही. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या मोकळ्या जागेमुळे कर्मचाऱ्यांना एकमेकांशी सहजपणे संवाद साधता येणार आहे. त्यामुळे एकमेकांमधील सहकार्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मार्क झकरबर्ग याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा