फेसबुकवर चीनमध्ये गेली ५ वर्षे बंदी आहे. पण फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्गने या बंदीची तमा न बाळगता चीनच्या एका विद्यापीठातील तरुणाईशी थेट त्यांच्या चिनी भाषेत संवाद साधत त्यांनाच जिंकायचा प्रयत्न केला!
मार्क झुकरबर्ग अलीकडेच चिनी भाषा शिकला आहे. चीनने २००९ पासून फेसबुकवर बंदी घातली आहे. स्वाभाविकच त्सिंगुहा विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हा मुद्दा येणारच होता. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनीही त्याला फेसबुकवरील बंदीसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावरील झुकेरबर्गच्या उत्तरांनी विद्यार्थ्यांमधून हास्याचे फवारे उडाले.
चीनने बंदी घातली असली तरी फेसबुक अनेक चिनी कंपन्यांना सहकार्य करीत असल्याचे झुकरबर्गने चिनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. भारतात लेनोवो या संगणकनिर्मिती कंपनीची जाहिरात फेसबुकवरून केली जाते, असे त्याने सांगितले. एका विद्यार्थ्यांने झुकरबर्गला थेट प्रश्न केला. तुमच्या चीनमध्ये प्रवेश करण्याच्या योजना काय आहेत, असा प्रश्न त्याने केला. त्यावर झुकरबर्ग उत्तरला, आम्ही चीनमध्ये आहोतच. चिनी कंपन्यांना परदेशामध्ये ग्राहक मिळावेत यासाठी आम्ही सहकार्य करीत आहोत. उर्वरित जगाने चीनशी संवाद साधावा, असा आमचा प्रयत्न असल्याचेही झुकरबर्ग याने सांगितले.

Story img Loader