तंत्रज्ञानप्रेमी म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र मोदी हे येत्या २६ ते ३० सप्टेंबरदरम्यानच्या अमेरिका दौऱ्याच्यावेळी लोकप्रिय समाज माध्यम असणाऱ्या फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी फेसबुकवरून यासंदर्भातील माहिती दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार असल्याने मी प्रचंड उत्साहित असल्याचे मार्कने म्हटले आहे.  यावेळी फेसबुकच्या मुख्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून प्रश्नोत्तरांचा तासही आयोजित करण्यात आला आहे.  सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडविण्यासाठी विविध मानवी समुदायांना कशाप्रकारे एकत्रितरित्या काम करता येईल, यासंदर्भात आम्ही चर्चा करणार असल्याचेही मार्कने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी मोदी आणि झुकरबर्ग दोघेजण मिळून लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही देणार आहेत. येत्या २७ सप्टेंबर रोजी पॅसिफिक प्रमाणवेळेनुसार ९.३० वाजता फेसबुकच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.