फेसबुक या लोकप्रिय समाजमाध्यमाचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्गलाही हॅकिंगचा फटका बसला आहे. झकरबर्ग यांची ट्विटर आणि पिंट्रेस्ट खाती हॅक करण्यात आली आहेत. ‘अवरमाईन टिम’ने हे हॅकिंग केल्याचा दावा केला आहे.

झकरबर्ग यांच्या लिंक्ड-इन खात्याद्वारे त्यांची ट्विटर आणि पिंट्रेस्ट खाती हॅक करण्यात आल्याचे ‘अवरमाईन टिम’ या हॅकर गटाने म्हटले आहे. २०१२ मध्ये लिंक्ड इनच्या लाखो खातेदारांचा तपशील हॅक करण्यात आला होता. त्यात झकरबर्गच्या खात्याचाही समावेश होता. त्याद्वारेच हॅकर्सनी त्यांची खाती हॅक केली आहेत. ‘अवरमाईन टिम’च्या ट्विटर हँडलवर ४०,००० फॉलोअर आहेत. दोन्ही समाजमाध्यमांवरील लाखो खाती असुरक्षित असल्याचे सिद्ध करण्यासाठी झकरबर्ग यांची खाती हॅक करण्यात आल्याचे ‘अवरमाईन टिम’ने नमूद केले आहे. या हॅकिंगनंतर ‘अवरमाईन टिम’चे ट्विटर खातेच स्थगित करण्यात आले.

झकरबर्ग यांचे इन्स्टाग्राम खातेही हॅक केल्याचा दावा ‘अवरमाईन टिम’ने केला. मात्र त्यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक खाते सुरक्षित असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. झकेरबर्ग यांची अन्य समाजमाध्यमांवरील खाती पुन्हा पूर्ववत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader