सचिन तेंडूलकरला भारतरत्न देणे म्हणजे देशाचा अपमान असल्याचे विधान करत ‘प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया’चे चेअरमन आणि माजी मुख्य न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. काटजू यांनी राज्यसभेतील अनुपस्थितीवरून सचिन आणि अभिनेत्री रेखा यांना लक्ष्य केले. या दोघांपेक्षा सुब्रमण्यम भारती, डॉ. कोटनिस, मिर्झा गालिब यांना भारतरत्न पुरस्कार देणे अधिक योग्य ठरले असते, असे काटजू यांनी सांगितले. यापूर्वी शुक्रवारी संसदेतील मोठय़ा प्रमाणावरील अनुपस्थिबाबत सचिन व ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यावर राज्यसभेत टीका करण्यात आली होती. त्यानंतर ”संसदेतील माझ्या अनुपस्थितीची मोठय़ा प्रमाणावर चर्चा होते आहे. संसदेसारख्या संस्थेचा अपमान करण्याचा मी विचारही करू शकत नाही. माझ्या कुटुंबातील आजारपणामुळे मला दिल्लीपासून दूर राहावे लागले,’ अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने व्यक्त केली होती.
”माझ्या कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे मला दिल्लीत हजेरी लावता आली नाही, ही गोष्ट खाजगीच राहावी अशी माझी इच्छा होती. माझा भाऊ अजितवर बायपास शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्याच्यासोबत राहणे हे माझे कर्तव्य होते, त्यामुळे संसदेत मी हजर राहू शकलो नाही,” असे सचिनने पुढे सांगितले.

Story img Loader