इन्स्टाग्रामवर रिल पाहणे आणि रिल बनवून अपलोड करण्याचा नाद अनेकांना लागलेला आपण आजूबाजूला पाहत असतो. अनेकजण सतत मोबाइलवर शॉर्ट व्हिडीओ पाहण्यात दिवस दिवस घालवत असतात. सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे अनेकांना फटका बसला आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधून अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामच्या अतिवापरामुळे एक मुलीचे लग्न मोडले आहे. मुलाने सांगितले की, होणारी नवरी रिल बनवून ते इन्स्टाग्रामवर टाकण्यातच व्यस्त असते. मुलगी सोशल मीडियावर खूप वेळ सक्रिय राहत असल्याचे कारण देऊन मुलाने लग्न करण्यास नकार दिला.

लग्न मोडल्याचे समजल्यानंतर मुलीनेही पोलिसांत धाव घेतली. मुलाच्या कुटुंबियांनी हुंडा मागितला होता. तो देण्यास नकार दिल्यामुळे लग्न मोडले, असा आरोपी मुलीने केला आहे. पोलिसांनी या विचित्र प्रकरणाची दखल घेतली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

शाहजहांपूरमध्ये राहणाऱ्या मुलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने म्हटले की, माझे लग्न १६ फेब्रुवारी रोजी उन्नाव जिल्ह्यातील मुलाशी ठरले होते. आम्ही शेती गहाण ठेवून लग्नाची तयारी केली होती. माझ्या कुटुंबातील लोकांनी खूप तयारी केली होती. पण ऐनवेळी मुलाने स्विफ्ट डिझायर गाडीची मागणी केली. पण गाडी देण्यास नकार दिल्यामुळे थेट लग्न मोडले. त्यामुळे आता मी पोलिसांकडे मदत मागत आहे.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये म्हटले की, १० ऑगस्ट २०२४ रोजी साखरपुडा झाला. उन्नाव जिल्ह्यातील एका मंदिरात सदर कार्यक्रम पार पडला. यानंतर मुलीच्या घरच्यांनी लग्नाची तयारी केली. लग्नासाठी हॉल बुक करण्यात आला. १६ फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. मात्र १५ फेब्रुवारी रोजी मुलाने फोन करून लग्नासाठी नकार दिला.

शाहजहांपुर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी चौकशी केली. त्यावेळी मुलाने सांगितले की, लग्न ठरल्यानंतरही मुलगी इन्स्टाग्रामवर रिल टाकतच राहिली. या रिलवर लोकांच्या नको नको अशा कमेंट्स येतात. यावरून आम्ही मुलीला अनेकदा इन्स्टाग्रामपासून दूर राहण्यास सांगितले. पण तरीही ती रिल टाकत राहिली. त्यामुळे आम्ही लग्नासाठी नकार दिला.

Story img Loader