Marriage Scams News : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय बांगलादेशी महिलेने चार वर्षात तब्बल चार लग्न करून कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या बिधाननगर पोलिसांनी एका महिलेला अटक केलं आहे. एवढंच नाही तर ती महिला मेडिकल व्हिसावर भारतात येत असायची. इकडे आल्यानंतर भारतातील तरुणांशी लग्न करायची आणि त्यानंतर त्या तरुणावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करून ब्लॅकमेल करायची.

या प्रकरणासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितलं की, साहना सादिक नावाच्या एका महिलेने गेल्या चार वर्षांत सहा वेळा भारताची सीमा ओलांडली आहे. तसेच बनावट ओळखीच्या आधारे चार वेळा लग्न केलं आहे. पण यापैकी एकाही विवाहाची अधिकृत नोंद कुठेही करण्यात आलेली नाही. माहितीनुसार, त्या महिलेने कोलकात्याच्या राजारहाट आणि न्यू टाऊन भागातील पतींवर घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल केलेले आहेत.

दरम्यान, ऑक्टोबर २०२४ मध्ये या महिलेने तिच्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत पतीने तिचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा दावा केला. तसेच ते फोटो पतीने सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्या महिलेचं पूर्वीचं रेकॉर्ड तपासलं आणि मोठी माहिती समोर आली. पूर्वीच्या रेकॉर्डमध्ये असं दिसून आलं की ती यापूर्वीही अनेकवेळा अशाच आरोपांवरून पोलीस ठाण्यात आली होती. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “जेव्हा ही महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली, तेव्हा ती ओळखीची वाटत होती. त्यामुळे आम्हाला संशय आला आणि आम्ही तिचं पूर्वीचं रेकॉर्ड तपासलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिने यापूर्वीही अशाच तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली आणि हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वी ओडिशात अशीच प्रकरणे उघडकीस आली होती. जिथे एका व्यक्तीने अनेक महिलांशी लग्न केलं आणि नंतर त्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओंद्वारे त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणांमध्ये बनावट विवाह आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांनी समाज हादरला असून पोलीस आता या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करत आहेत.

Story img Loader