आर्य समाज मंदिरांमध्ये कुठल्याही पुरुष आणि महिलेने हिंदू किंवा वैदिक पद्धतीने केलेला विवाह हा हिंदू मॅरेज अॅक्टनुसार कायदेशीर आहे असा निर्णय अलाहबाद न्यायालयाने दिला आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम ७ मध्ये अशी नोंद आहे की वैदिक किंवा हिंदू रिती रिवाजांप्रमाणे लग्न झाल्यास तो कायदेशीर मानला जाईल. ते लग्न एखाद्या घरी झालं असेल, मंदिरात झालं असेल किंवा कार्यालयात झालं असेल तरीही हा विवाह कायदेशीर असेल. हा संदर्भ देत न्यायलयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या पीठाने काय म्हटलं आहे?
न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या पीठाने असं म्हटलं आहे की आर्य समाज मंदिरात वैदिक पद्धतीने किंवा हिंदू चाली रितींप्रमाणे विवाह केल्यास तो कायदेशीर आहे. कन्यादान, पाणीग्रहण, सप्तपदी, भांगेत कुंकू भरण्याचा विधी आणि मंत्रोच्चार हे हिंदू चाली रितींनुसार विवाह संस्कार पूर्ण करतात. हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम ७ नुसार अशा पद्धतीने मंदिरात झालेला विवाहही कायदेशीर असेल. न्यायालयाने असंही म्हटलं आहे की आर्य समाज मंदिराने किंवा त्या विश्वस्त मंडळाने मंदिरात लग्न झाल्याचं प्रमाणपत्र दिलं असेल तर प्राथमिकदृष्ट्या तो महत्त्वाचा कागद नाही. पण तो अगदीच वाया गेलेला कागद नसेल. कारण मंदिरात लग्न लावणारे जे पुरोहित होते त्यांच्याद्वारे या प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करता येईल.
महाराज सिंह नावाच्या व्यक्तीची याचिका न्यायालयाने फेटाळली
अलाहबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर एकल पीठाने महाराज सिंह नावाच्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत त्याच्या पत्नीने कलम ४९८ (कौटुंबिक हिंसाचार) अंतर्गत केलेली याचिका रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्याने हे म्हटलं होतं की विवाह मंदिरात झाला आहे त्यामुळे तो कायदेशीर मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे कलम ४९८ (कौटुंबिक हिंसाचार) अन्वये दाखल होणारे गुन्हे आपल्यावर लागू होऊ शकत नाहीत. तसंच याचिकाकर्त्याने हेदेखील म्हटलं होतं की आर्य समाज मंदिरात लग्न झालेलं नाही. शिवाय जे विवाह प्रमाणपत्र पत्नीने सादर केलं ते बनावट आहे. मात्र न्यायालयाने हा विवाह ज्या पुरोहितांनी लावला त्यांची साक्षही नोंदवली आणि याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावत मंदिरांमध्ये झालेला विवाहही कायदेशीर आहे असं म्हटलं आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
न्यायालयाने काय म्हटलं आहे?
न्यायालयाने हे म्हटलं आहे की हिंदू विवाह पद्धतीमध्ये विविध समुदायांच्या वेगवेगळ्या चालीरिती आहेत. त्यामुळे वैदिक पद्धतींचाही समावेश आहे. विवाह हा स्त्री आणि पुरुष यांच्यातलं पवित्र बंधन आहे. वैदिक पद्धतीने केलेला विवाह हा आपल्याकडे संस्कार मानला गेला आहे. त्यामुळे आर्य समाज मंदिरांमध्ये झालेला विवाह हा कायदेशीर मानला जाईल.