भारताची साडेचारशे कोटी रुपयांची देशी मंगळ मोहीम अर्थपूर्ण संशोधनासाठी हाती घेण्यात आल्याच्या दाव्यावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी असहमती दर्शवली असून ही मोहीम म्हणजे प्रसिद्धीची एक युक्ती आहे, असा आरोप केला आहे. जी. माधवन नायर यांच्या काळात भारताचे पहिले यान चंद्राच्या दिशेने सोडण्यात आले होते व ती मोहीम बऱ्याचअंशी यशस्वीही झाली होती.
जी. माधवन नायर यांनी सांगितले, की भारतीय अंतराळ संशोधन संस्था अतिशय भपकेबाज योजनेचा पाठपुरावा करीत असून, त्यामुळे केवळ प्रसिद्धीचा उद्देश साध्य होणार आहे.
नायर हे सहा वर्षे इस्रोचे अध्यक्ष होते व त्यांच्या काळात चांद्रयान १ मोहीम यशस्वी करण्यात आली होती. दळणवळणासाठी लागणाऱ्या ट्रान्सपाँडर्सचा सध्या मोठय़ा प्रमाणात तुटवडा असून, कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींमध्ये त्याकडे लक्ष वेधूनही इस्रोने तो प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले नाही असे ते म्हणाले.
ते म्हणाले, की आता उड्डाण होणारच असले तरी ते पीएसएलव्हीचे असेल. मंगळ मोहीम हा शब्द उच्चारण्यासही अजून आठ महिने वाट पाहावी लागेल. भारताच्या मंगळ मोहिमेचा वैज्ञानिक समुदायाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपल्यामते जीएसएलव्ही प्रक्षेपक या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आला होता. कारण असा प्रक्षेपकच १८०० किलो वजनाचा उपग्रह वाहून नेऊ शकतो तसेच त्यावर इतर डझनभर तरी वैज्ञानिक उपकरणे ठेवता आली असती. तसेच त्यामुळे मार्स ऑर्बायटर हे मंगळाच्या अगदी जवळच्या वर्तुळाकार कक्षेत पाठवता आले असते. ज्यामुळे दूरसंवेदन तंत्राने मंगळाचे निरीक्षण सोपे झाले असते. आता सध्या मार्स ऑर्बायटर मोहिमेचा गाजावाजा होत असला तरी जीएसएलव्हीमधील समस्या सुटत नसल्याने शेवटी पीएसएलव्हीच्या मदतीने काय करता येईल याचा विचार करण्यात आला. नंतर १५०० किलोचा उपग्रह नेता येईल असे ठरले, पण इंधनमर्यादेमुळे तो ३८० बाय ८०००० कि.मी. कक्षेपर्यंतच नेता येईल असे दिसून आले. एवढय़ा उंचीवरून मंगळाची पाहणी अशाप्रकारे कुणीच करणार नाही.
मंगळ मोहिमेत अर्थपूर्ण संशोधन होणार असून, त्यात भारताची मंगळाच्या दिशेने उपग्रह सोडण्याची तंत्रक्षमता सिद्ध होणार आहे. मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेणे, तेथील पर्यावरणाचा अभ्यास करणे व छायाचित्रे घेणे ही या मोहिमेची उद्दिष्टे असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी सांगितले होते.
भारताची मंगळ मोहीम हा प्रसिद्धीचा स्टंट- जी. माधवन नायर
जी. माधवन नायर यांनी सांगितले, की भारतीय अंतराळ संशोधन संस्था अतिशय भपकेबाज योजनेचा पाठपुरावा करीत असून, त्यामुळे केवळ प्रसिद्धीचा उद्देश साध्य होणार आहे.
First published on: 25-07-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars mission is a publicity stunt isro ex chief madhavan nair