पत्रिकेत आडवा आल्यामुळे अनेकांचे ‘शुभमंगल’ अडवून ठेवण्याचा ठपका असलेला मंगळ बुधवारी भारताला पहिल्याच प्रयत्नात लाभला. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह असलेल्या तांबूस तपकिरी मंगळावर यशस्वी स्वारी करीत भारताने अमेरिका, युरोपीय महासंघ आणि रशिया या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे, या देशांपेक्षा अत्यंत कमी खर्चात राबवलेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेने पहिल्याच प्रयत्नात मंगळाची कक्षा गाठून नवा पराक्रम केला. चीन आणि जपान या प्रगत देशांनाही जे जमले नाही ते करून दाखवत भारताने मंगळावर स्वारी करणाऱ्या पहिल्या आशियाई देशाचाही बहुमान मिळवला आणि देशभर मांगल्याचे सूर निनादले!
यानाची क्षमता, त्यावरील उपकरणांची उपयुक्तता आणि एकूणच मोहिमेविषयीच्या शंका-कुशंकांना मागे टाकत मंगळयानाने गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने अवकाशात उड्डाण केले होते. त्यानंतर गेले ११ महिने मंगळयानाचा अविरत आणि अचूक प्रवास सुरू होता. तीच अचूकता यानाने बुधवारीही कायम ठेवली. मोहिमेचे शिल्पकार असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) वातावरण  तर भारावून गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्यासह असंख्य वैज्ञानिक इस्रोच्या बंगळुरू कार्यालयातील टेलिमेट्री केंद्रात हे अभूतपूर्व यश पाहण्यासाठी हजर होते. मंगळाच्या कक्षेने यानाला सहजपणे सामावून घेताच सर्वानीच टाळय़ांचा कडकडाट केला. भारताच्या पहिल्यावहिल्या मंगळमोहिमेचे हे यश केवळ देशभरातच नव्हे तर जगभरातील अवकाश संशोधन संस्थांनी व संशोधकांनी अनुभवले आणि भारतावर अभिनंदनाचा वर्षांव केला.
नेत्रदीपक कामगिरी
*पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा पहिलाच देश. आजवर जगभरात ५१ मंगळ मोहिमा झाल्या. मात्र, त्यापैकी केवळ २२ यशस्वी होऊ शकल्या.
*मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या अमेरिका, युरोपीय समुदाय व रशिया यांच्या पंक्तीत सामील.
*यशस्वी मंगळस्वारी करणारा पहिला आशियाई देश.
*मंगळ मोहिमेसाठी अमेरिकेच्या ‘नासा’ने चार हजार कोटी रुपये खर्च केले असताना भारताची ही मोहीम साडेचारशे कोटी रुपयांत यशस्वी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज ‘मॉम’(अवकाशयान- मार्स ऑर्बिटर मिशन) मंगळाला भेटली. आज मंगळाला आई मिळाली, आई आपल्याला निराश करणार नाही.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आज ‘मॉम’(अवकाशयान- मार्स ऑर्बिटर मिशन) मंगळाला भेटली. आज मंगळाला आई मिळाली, आई आपल्याला निराश करणार नाही.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान