रशियाची मदत घेणार नाही, अमेरिकेची अल्प मदत
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान २ मोहीम स्वदेशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात रशियाची मदत घेतली जाणार नाही, अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, चांद्रयान २ मोहीम पूर्णपणे स्वदेशी राहील. त्यातील लँडर व रोव्हर भारतातच तयार केले जातील. डिसेंबर २०१७ मध्ये किंवा २०१८ च्या पूर्वार्धात भारताचे चांद्रयान २ झेपावेल. त्यात चंद्रावरील खडक व माती गोळा करून त्यांची माहिती पृथ्थकरणानंतर पृथ्वीकडे पाठवणारी उपकरणे असतील. चांद्रयान २ च्या आधी भारताने चांद्रयान १ मोहीम यशस्वी केली आहे. त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. चांद्रयान २ प्रकल्पात रशियाचा सहभाग घेतला जाणार होता, पण आता तसे केले जाणार नाही केवळ अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाईल. २०१० मध्ये रशियाच्या ग्लावकॉसमॉस संस्थेला लँडर तयार करण्यात सहभागी करण्याचे ठरवले होते व इस्रो ऑर्बिटर तसेच रोव्हर तयार करणार होती. पण आता सगळे भारतच तयार करणार आहे. रशियन लँडरबाबत काही अडचणी होत्या व त्यात आणखी चाचण्यांची गरज होती. दरम्यान इस्रोने आता लँडर व रोव्हर, ऑर्बिटर सगळे स्वत:च तयार करण्याचे ठरवले आहे. कुठलेही यानाचे निरीक्षण एका ठिकाणाहून करून चालत नाही त्यामुळे नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली जाणार आहे. रशियाची मदत घेतली जाणार नाही असे कुमार यांनी सांगितले. १९७४ व १९९८ च्या अणुस्फोटानंतर अमेरिकेच्या नासा संस्थेने भारताला सहकार्य करण्यास नकार दिला होता, पण नंतरच्या काळात नासाने सहकार्याची भूमिका घेतली आहे. रशियाला चांद्रयान २ मोहिमेत स्थान नसले तरी इतर प्रकल्पात त्यांची मदत घेतली जाणार आहे. लहान क्रायोजेनिक इंजिनांच्या चाचणी प्रकल्पात रशियाची मदत घेतली जाईल. संयुक्त प्रकल्पांमुळे खर्च विभागला जातो त्यामुळे आताचा जमाना हा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आहे असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा