मंगळाच्या संशोधनासाठी भारताचे मार्स ऑरबायटर यान श्रीहरिकोटा येथून ५ नोव्हेंबरला सोडले जाणार असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज जाहीर केले.  सूत्रांनी सांगितले की, मार्स ऑरबायटर मिशन म्हणजे ‘मंगळयान पीएसएलव्ही २५’ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ५ नोव्हेंबरला दुपारी ३.२८ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सोडले जाईल. चेन्नईपासून ८० कि.मी. अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटा या आंध्र प्रदेशातील ठिकाणाहून ते सोडले जाणार आहे.
खरेतर हे यान १९ ऑक्टोबरला सोडण्यात येणार होते, पण दक्षिण पॅसिफिकमधील खराब हवामानामुळे आता ते उशिरा सोडले जाणार आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या एक्सएल आवृत्तीच्या मदतीने मंगळयान म्हणजे मार्स ऑरबायटर आता नोव्हेंबरमध्ये सोडले जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ४५० कोटी रूपये असून त्याची प्राथमिक उद्दिष्टे हे मंगळावर उपग्रह पाठवण्याची भारताची तांत्रिक क्षमता सिद्ध करणे, तेथील जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत माहिती गोळा करणे, छायाचित्रे घेणे अशी अनेक उद्दिष्टे या मोहिमेत आहेत.
श्रीहरिकोटा येथे मंगळयानाच्या पाठवणीची तयारी पूर्ण झाली असून त्याचे वजन १३५० किलो आहे. त्यातील प्रक्षेपकाची किंमत ११० कोटी आहे. या मार्स ऑरबायटर बरोबर एकूण १५ किलोची उपकरणे पाठवण्यात येणार असून त्यातील पाच उपकरणे ही मंगळाच्या पृष्ठभागाची व वातावरणाची माहिती घेणार आहेत. पृथ्वीच्या कक्षेत काही काळ फिरल्यानंतर ते खोल अवकाशात दहा महिन्यांचा प्रवास करून मंगळाच्या कक्षेत जाईल. सप्टेंबर २०१४ मध्ये ते मंगळाच्या कक्षेत जाणे अपेक्षित आहे. मार्स ऑरबायटर मंगळाच्या ३७२ कि.मी. बाय ८०००० कि.मी.  अंडाकार कक्षेत पोहोचल्यानंतर संशोधन करील. मार्स ऑरबायटर मिशनचा मूळ हेतू जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेला मिथेन शोधणे हा आहे. त्यासाठी त्यावर मिथेन संवेदक लावलेला आहे.

Story img Loader