पाकिस्तान आणि चीन हे भारताचे शेजारी देश. दोघांशी भारताची युद्धे झडली आहेत. दोघे भारताविरोधात एकत्र आहेत आणि तरीही दोघांशी संबंध सुधारण्यावर भारताचा आणि त्यांचाही भर आहे. चीनचे अध्यक्ष नुकतेच भारतदौऱ्यावर येऊन गेले आणि घुसखोरही येऊन गेल्याने वातावरण तापले असतानाच भारताचे ‘मंगळयान’ मंगळाच्या कक्षेत शिरले आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान पाठविणारा भारत हा जगातला एकमेव देश ठरला. त्याचे मंगलध्वनीमय पडसाद चीन आणि पाकिस्तानातही उमटले आहेत. भारताच्या या यशाने संपूर्ण उपखंडाची मान उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया पहिल्या व्यावसायिक अंतराळमोहिमेत सहभागी होत असलेल्या पाकिस्तानी महिला अंतराळवीर नमिरा सलिम यांनी दिली आहे तर भारताच्या या यशाने आम्हाला आनंदच झाला आहे, असे चीनने म्हटले आहे.
विशेष म्हणजे २०११मध्ये चीनची मंगळ मोहीम अपयशी ठरली होती. त्यामुळे भारताच्या यशाचे पडसाद चीनच्या सरकारी प्रसिद्धी माध्यमांत उमटले आहेत. या प्रश्नावर आम्हाला मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही. मात्र आम्हा चिन्यांना माहीत आहे की तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने विचार करता आम्ही भारताच्या कित्येक पावलं पुढेच आहोत, अशी खोचक प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वृत्तपत्राने ‘भारताच्या मंगळयशाने अंतराळ संशोधनाला उभारी’ या शीर्षकाखाली अग्रलेख छापला आहे. त्यात म्हटले आहे की, चीनच्या मंगळ मोहिमेला मागे टाकल्याबद्दल भारतीयांनी मोठा जल्लोष साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास इस्रोच्या केंद्रात हजर होते. या यशानंतर भारतीय संकेतस्थळांवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात काहीजणांनी, ही चीनच्या जखमेवर मीठ चोळणारी मोहीम होती, असा आनंद व्यक्त करणे मात्र अत्यंत गंभीर आहे, असे अग्रलेखाने नमूद केले आहे. त्याचबरोबर, भारतासारखा वैज्ञानिक प्रगतीत मागास असलेला देशही हे यश मिळवू शकत असेल तर चीनच्या पुढील मोहीमेला यश मिळणे कठीण नाही, असा खोचक टोलाही ‘ग्लोबल टाइम्स’ने हाणला आहे.
चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी, ही भारतासाठी आणि आशियासाठीही मोठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया तत्परतेने दिली आहे. चीनच्या सर्वच वृत्तपत्रांनी मंगळयानाच्या यशाची कहाणी सचित्र आणि ठळकपणे छापली आहे.
पाकिस्तानने अधिकृतपणे मात्र प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्ताननेही १९६१मध्ये अंतराळ संशोधन संस्था स्थापली असली तरी अद्याप एक उपग्रहही सोडलेला नाही.
नमिरा आनंदली
२०१५मध्ये अंतराळ मोहीमेवर जात असलेली पाकिस्तानची पहिली अंतराळ वीर नमिरा सलिम हिने ‘मंगळयान’च्या यशाचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. दक्षिण आशियासाठी ही मोठी झेप आहे. अत्यंत कमी खर्चात ही मोहीम यशस्वी करून दाखविल्याबद्दल इस्रोच्या संशोधकांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. कराचीत १९७५मध्ये जन्मलेली नमिरा ही २००७मध्ये उत्तर ध्रुवावर आणि २००८मध्ये दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारी पहिली पाकिस्तानी महिलाही आहे. नमिरा आनंदली
२०१५मध्ये अंतराळ मोहीमेवर जात असलेली पाकिस्तानची पहिली अंतराळ वीर नमिरा सलिम हिने ‘मंगळयान’च्या यशाचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. दक्षिण आशियासाठी ही मोठी झेप आहे. अत्यंत कमी खर्चात ही मोहीम यशस्वी करून दाखविल्याबद्दल इस्रोच्या संशोधकांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. कराचीत १९७५मध्ये जन्मलेली नमिरा ही २००७मध्ये उत्तर ध्रुवावर आणि २००८मध्ये दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारी पहिली पाकिस्तानी महिलाही आहे.
चीन, पाकिस्तानातही ‘मंगलध्वनी’ निनादला ..
पाकिस्तान आणि चीन हे भारताचे शेजारी देश. दोघांशी भारताची युद्धे झडली आहेत. दोघे भारताविरोधात एकत्र आहेत आणि तरीही दोघांशी संबंध सुधारण्यावर भारताचा आणि त्यांचाही भर आहे.
First published on: 26-09-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars orbiter mission success draws praise from china pakistan