भारताचे महत्त्वाकांक्षी मंगळयान म्हणजेच ‘मार्स ऑरबायटर यान’ बुधवारी मंगळाच्या कक्षेत झेपावणार असून, मात्र या ‘मंगळदिना’पूर्वी म्हणजेच सोमवारी या यानाच्या लिक्विड अॅपोजी मोटारची चाचणी काही सेकंदांसाठी केली जाणार आहे. ही मोटार प्रज्वलित करून नंतर बंद करण्यात येईल. बुधवारी अंतिम टप्प्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रोच्या बंगळुरू येथील अवकाश नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत.
४४० न्यूटन बल निर्माण करणारी ही मोटार गेली ३०० दिवस बंद होती, ती चार सेकंदांसाठी प्रज्वलित केली जाईल. जर हा टप्पा यशस्वी पार पडला तर भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वैज्ञानिकांचे मनोबल वाढणार आहे, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. ‘‘मंगळयानाची चौथी मार्गदुरुस्ती करण्यासाठी सोमवारी हा प्रयोग करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे आदेश अवकाशयानास आधीच देण्यात आले आहेत. लिक्विड अॅपोजी मोटारची ही चाचणी बुधवारच्या अंतिम टप्प्याची रंगीत तालीम असेल. २२ सप्टेंबरला ही मोटार ३.९६८ सेकंद प्रज्वलित केली जाणार आहे.
भारताचे मंगळयान (मार्स ऑरबायटर मिशन-मॉम) हे पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने श्रीहरिकोटा येथून मंगळाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. ६६.६० कोटी कि.मी. अंतराच्या या प्रवासात मंगळयान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झाले होते. उद्याच्या चाचणीत काही अडचणी आल्या तर पर्यायी योजना तयार असून त्यात आठ थ्रस्टर्स जास्त काळासाठी प्रज्वलित करून यान मंगळाच्या कक्षेत पाठवले जाईल, पण मग त्याचे इंधन कमी राहील. २४ सप्टेंबरला यानाचा वेग सेकंदाला २२.१ किलोमीटर वरून सेकंदाला ४.४ किलोमीटर इतका कमी केला जाईल. नंतर ते मंगळाच्या कक्षेत जाईल. त्या वेळी इंजिन २४ मिनिटे प्रज्वलित केले जाईल.
आली ‘मंगळ’ घटिका समीप!
भारताचे महत्त्वाकांक्षी मंगळयान म्हणजेच ‘मार्स ऑरबायटर यान’ बुधवारी मंगळाच्या कक्षेत झेपावणार असून, मात्र या ‘मंगळदिना’पूर्वी म्हणजेच सोमवारी या यानाच्या लिक्विड अॅपोजी मोटारची चाचणी काही सेकंदांसाठी केली जाणार आहे.
First published on: 22-09-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars orbiter set to enter orbit of red planet on september