भारताने मंगळाच्या कक्षेत सोडलेल्या मार्स ऑरबिटर मिशन म्हणजे मॉम यानाने तेथील प्रकाश परावर्तनचे दृश्य टिपले असून, त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभागाच्या गुणधर्माचा अभ्यास करणे सोपे जाईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने म्हटले आहे.
मॉम यानाने एक नकाशा सादर केला असून, त्यात मंगळावरील प्रकाशाचे परावर्तन १.६५ मायक्रॉन इतक्या अचूकतेने टिपले आहे. मिथेन सेन्सर फॉर मार्स पेलोडने तो नकाशा तयार केला असून, त्यातील निळा रंग हा कमी परावर्तन सूचित करतो, तर लाल रंग जास्त प्रकाश परावर्तन सूचित करतो. सौरऊर्जेचे प्रकाशाच्या माध्यमातून मंगळावरून अवकाशात परावर्तन होत असते. आताचा नकाशा ०.५ अंश अक्षांश बाय ०.५ अंश रेखांश इतक्या विवर्तनाचा असून, त्यामुळे कार्बन डायॉक्साईड नेमका किती प्रमाणात वातावरणात शोषला जातो याची माहिती मिळत आहे.
पृष्ठभागाचे गुणधर्म
सौरऊर्जेचे म्हणजेच प्रकाशाचे परावर्तन मार्स कलर कॅमेऱ्याने मोजले असून, त्यामुळे तेथील पृष्ठभागाचे गुणधर्म कळू शकतील असे इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
भारताचे मार्स ऑरबिटर मिशन ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडण्यात आले होते व ते सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत पोहोचले होते. या प्रवासाला नऊ महिने लागले होते. मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे यान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला होता.
त्यावर पाच उपकरणे म्हणजे पेलोड असून मिथेन संवेदक, रंगीत छायाचित्रे टिपणारा कॅमेरा, औष्णिक छायाचित्रण वर्णपंक्तिमापक यांचा समावेश आहे.
मिथेनचे प्रमाण शोधणार
एमएसएम म्हणजे मिथेन संवेदकाच्या मदतीने तेथील मिथेनचे प्रमाण शोधण्यात येणार आहे. मिथेन संवेदकाला दोन मार्गिका असून, त्यात मिथेनचा शोध धेणारी एक व मंगळावरील सौरऊर्जेच्या परावर्तनाची दुसरी मार्गिका आहे. त्या परावर्तन नकाशातून मंगळाविषयी बरीच माहिती मिळू शकेल असे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader