भारताच्या मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून मार्स ऑरबायटर यानाची श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर गुरुवारी चाचणी घेतली जाणार आहे. हे ऑरबायटर यान ४३० कोटी रुपये खर्च करून तयार केले आहे.
इस्रोचे संचालक पी. कुनीकृष्णन यांनी सांगितले की, सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी ही सराव चाचणी घेतली जाईल. त्यात फक्त इग्नाइट म्हणजे प्रज्वलनाचे बटन दाबले जाणार नाही बाकी सर्व प्रक्रिया तपासून पाहिल्या जातील तसेच सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडत असल्याची खात्री करून घेतली जाईल.
पीएसएलव्ही सी २५ या प्रक्षेपकाच्या मदतीने मार्स ऑरबायटर यान ५ नोव्हेंबरला दुपारी २.३६ वाजता श्रीहरीकोटा येथून सोडले जाणार आहे. यानाची सराव चाचणीमध्ये शेवटच्या साडेआठ तासातील प्रक्रियेचे सादृश्यीकरण केले जाणार आहे. एकूण ५६ तासांची उलटगणती ही रविवारपासून सुरू केली आहे. उपग्रहाच्या बॅटरीची तपासणी केली जाणार असून मोबाईल सव्‍‌र्हिस टॉवर सेवा काढणे, इतर तांत्रिक बाबींची तपासणी करणे, विद्युत तपासणी करणे याचा सराव चाचणीत समावेश
आहे. मार्स ऑरबायटर उपग्रह पीएसएलव्ही प्रक्षेपकाला जोडण्यात आला असून प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबरला उलटगणती सुरू होईल. मार्स ऑरबायटरच्या उड्डाणासाठी आम्ही सज्ज असून पीएसएलव्ही सी २५ या प्रक्षेपकाची उद्या मर्यादित चाचणी घेऊन तपासणी केली जाईल. ५ नोव्हेंबरला मार्स ऑरबायटर यानाचे उड्डाण होणार आहे.
भारताची ही पहिलीच मंगळ मोहीम असून त्यात आंतरग्रहीय संशोधनासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे हा प्रमुख हेतू आहे. जीएसएलव्ही डी-५ या प्रक्षेपकाचे उड्डाण ऑगस्टमध्ये इंधनगळतीमुळे रद्द करण्यात आले होते. राधाकृष्णन यांनी सांगितले की, जीएसएलव्ही मधील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम चालू आहे. १५ डिसेंबपर्यंत तो उड्डाणासाठी सज्ज होईल असे राधाकृष्णन यांनी सांगितले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars ready to for test today
Show comments