देशभरातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसंच, अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारद्वारेही मंदिरांचा कायापालट केला जात आहे. आता आठव्या शतकातील वास्तुकलेचे अद्भूत उदाहरण असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा पुरावा म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं.
प्रशासनाने २७ मार्च रोजी एक अध्यादेश जारी करून सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मार्तंड सूर्य मंदिराची सुरक्षा, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश संस्कृती विभागाला देण्यात आले आहेत. सम्राट ललितादित्य मुक्तापीड मूर्ती स्थापन करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. ललितादित्य मुक्तापिद यांनीच आठव्या शतकात मार्तंड सूर्य मंदिर बांधले होते.
अयोध्येशी थेट कनेक्शन
अयोध्येतील राम मंदिरातील एक कलश अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा सूर्य मंदिरातील मैदानात ठेवण्यात आला होता. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या भक्तांच्या सहकार्याने या कलशाची स्थापना केली होती.
मंदिराचं वैशिष्ट्य काय?
मार्तंड सूर्य मंदिर हे काश्मिरी स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमूना आहे. हे मंदिर पठाराच्या शिखरावर असून चिनी परंपरेतील घटकांचीही वास्तुशास्त्रीय कला यात दडलेली आहे. या मंदिरात एक भव्य प्रांगण असून त्याच्या मध्यवर्ती मंदिर आहे. तसंच, ८४ लहान देवस्थानांनी हे मंंदिर वेढलेलं आहे. २२० फूट लांबी आणि १४२ फूट रुंदीचं हे मंदिर आहे.
मंदिराचा इतिहास काय सांगतो?
आठव्या शतकात ललितादित्य मुक्तपिदाने सुरू केलेले मार्तंड सूर्यमंदिर हे एकेकाळी पूजेचे ठिकाण असले तरी, १४व्या शतकात सिकंदर शाह मिरीने ते नष्ट केले होते. काश्मीरमध्ये (१०८८-९०) जेव्हा अतिरेकीपणा वाढत होता त्यावेळेस या मंदिरावर वेळोवेळी विविध ठिकाणी हल्ले झाले. २० व्या शतकात एएसआयने मंदिर अवशेष संवर्धनासाठी ताब्यात घेतले तेव्हा तेथे कोणतीही पूजा किंवा हिंदू विधी होत नव्हते. तसंच, बऱ्याच काळापासून मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी करण्यात येत होती, अखेर तो क्षण आता आला आहे.