Daughter in Law Smriti Singh : गेल्यावर्षी सियाचीनमध्ये आपल्या साथीदारांना वाचवताना शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या धाडस आणि शौर्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ५ जुलै रोजी किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. यावेळी अंशुमन सिंग यांच्या पत्नी स्मृती सिंग (Smriti Singh) यांनी केलेलं भाषणही व्हायरल झालं होतं. आता अंशुमन सिंग यांच्या पालकांनी वेगळीच वस्तुस्थिती माध्यमांसमोर सांगितली आहे. यामध्ये त्यांनी सून स्मृती सिंग यांच्यावर आरोप केले आहेत.
मुलाच्या फोटोव्यतिरिक्त आमच्याकडे काहीच नाही
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंशुमन सिंग यांचे पालक म्हणाले, NOK (Next of Kin) चे निकष बदलले पाहिजेत. अंशुमनची पत्नी आता आमच्याबरोबर राहत नाही. त्यांच्या लग्नाला फक्त पाच महिने झाले होते, त्यांना कोणतंही मूल-बाळ नाही. भिंतीला टांगलेल्या मुलाच्या फोटोव्यतिरिक्त आता आमच्याकडे काहीही उरलेलं नाही. स्मृती सिंग यांनी त्यांचा पत्ताही बदलला आहे. माझ्या मुलाच्या फोटोवर लावण्याकरता एकही चक्र माझ्याकडे नाही.
NOK चे निकष बदलले पाहिजे
“NOK ची परीभाषा बदलली पाहिजे. शहीद जवानाला पत्नी असेल, पत्नी नसेल तर, त्याच्यावर कुटुंबातील किती लोकांचा भार होता, या सर्व अनुषंगाने NOK ची परिभाषा बदलली पाहिजे”, असंही ते म्हणाले. “यासंदर्भात मी राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी यांनाही याबाबत सांगितलं आहे. राहुल गांधी यांनीही आश्वासन दिलं आहे की याबाबत राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करतील. यावर काहीतरी उपाय शोधला जाईल”, असंही ते म्हणाले.
शहदी जवानाच्या पालकांनाही त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत
तर, इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना, कॅप्टन अंशुमन सिंग यांचे वडील रवी प्रताप सिंग म्हणाले की, त्यांच्या सुनेने त्यांच्या मुलाशी संबंधित सर्व पत्रव्यवहारात कायमचा पत्ता बदलला आहे. आता ती गुरुदासपूर येथे राहते. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची रक्कम आणि इतर सुविधांबाबतही नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात जेणेकरुन शहीदाच्या पत्नीसह पालकांना त्यांचे हक्क मिळतील. सरकारने पत्नीसह पालकांना कीर्ती चक्रासारख्या लष्करी सन्मानाची प्रतिकृती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मुलाच्या आठवणी जपता येतील.”
ते पुढे म्हणाले, ” आम्ही अंशुमनचे स्मृतीबरोबर त्याच्या संमतीने लग्न केले . लग्नानंतर ती माझ्या मुलाबरोबर नोएडामध्ये राहू लागली. १९ जुलै २०२३ रोजी अंशुमनच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मी त्यांना लखनौला बोलावले आणि आम्ही गोरखपूरला त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो. अंतिम संस्कारानंतर स्मृतीने गुरुदासपूरला परत जाण्याचा आग्रह धरला. दुसऱ्या दिवशी, ती तिच्या आईसोबत नोएडाला गेली आणि तिच्यासोबत अंशुमनचा फोटो अल्बम, कपडे आणि इतर सामानही घेऊन गेली.”
दोन तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर हिचा व्हिडीओ अनेकांना भावुक करून गेला होता
— Pratik S Patil (@Liberal_India1) July 12, 2024
आणि
आज वेगळीच वस्तुस्थिती समोर आली
pic.twitter.com/bQMWJadqA7
किर्ती चक्राला स्पर्शही करता आला नाही
रवी प्रताप सिंग यांनी पुढे दावा केला की ५ जुलै रोजी राष्ट्रपतींनी आपल्या मुलाला दिलेले किर्ती चक्राला ते स्पर्शही करू शकले नाहीत. “जेव्हा अंशुमनला कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले, तेव्हा त्याची आई आणि पत्नी हा सन्मान घेण्यासाठी गेल्या होत्या. राष्ट्रपतींनी माझ्या मुलाच्या बलिदानाचा किर्ती चक्राने सन्मान केला, पण मी त्याला एकदाही हात लावू शकलो नाही”, रवि प्रताप सिंग म्हणाले.
पुरस्कार सोहळ्याची आठवण करून देताना कॅप्टन अंशुमन सिंग यांची आई मंजू म्हणाली, “५ जुलै रोजी मी स्मृतीसोबत राष्ट्रपती भवनात झालेल्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. जेव्हा आम्ही कार्यक्रमातून बाहेर पडत होतो, तेव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मी फोटोसाठी किर्ती चक्र हातात धरले होते. पण त्यानंतर स्मृतीने (Smriti Singh) माझ्या हातातून किर्ती चक्र घेतले.”
रवी प्रताप यांनी असाही आरोप केला की जेव्हा सरकारने कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता. या पुतळा अनावरपणाच्या कार्यक्रमाला हे किर्ती चक्र आणावं अशी मागणी मी स्मृती आणि तिच्या वडिलांकडे केली होती. परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
सुना पळून जातात, पालकांचा आदर केला पाहिजे
शहीद अंशुमन सिंह यांची आई मंजू सिंह म्हणाल्या की, सून पळून जातात. पालकांचा आदर केला पाहिजे. आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना विनंती केली आहे की शहीद झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांमध्ये पत्नीव्यतिरिक्त त्यांच्या पालकांचीही काळजी घेतली जावी. हे धोरण बदलले पाहिजे. कारण, इतर शहीद जवानांच्या पालकांनाही अशाच पद्धतीचा सामना करावा लागत असेल. असे अनेक प्रकार समोर येत आहेत.
स्मृती सिंग काय म्हणाल्या? (What did Smriti Singh Say?)
याप्रकरणावर स्मृती सिंग यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जनसत्तातील वृत्तानुसार स्मृती सिंग म्हणाल्या, याबाबत मला काहीही माहिती नाही. ज्याची जशी विचारसरणी असते त्याच्याबाबतीत तसंच होतं. मला याबाबत काहीच अडचण नाही. सध्या मी बाहेर आले आहे.
शहीद अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंग या पेशाने अभियांत्रिक असून त्यांचे पालक शाळेत मुख्याध्यापक आहेत.