शहीद दिवसाच्या पार्श्वभूमीवर चंदीगढ महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या बॅनर्सवरून सध्या मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कारण महानगरपालिकेने कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शहरभर जी बॅनर्स लावली आहेत त्यावर भारतीय सैनिकांऐवजी चक्क अमेरिकन सैनिकांची छायाचित्रे झळकत आहेत. ही बॅनर्स तयार करतेवेळी थेट इंटरनेटवरून छायाचित्रे डाऊनलोड करण्यात आली असावी आणि तेव्हाच ही चूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बॅनर्सवर असलेल्या सैनिकांनी अमेरिकन लष्कराचा पोशाख घातल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. कहर म्हणजे मूळ छायाचित्रातील अमेरिकेचा राष्ट्रध्वज दिसू नये, यासाठी छायाचित्रात काही बदल करण्यात आले. मात्र, या नादात इतर तपशीलांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे बॅनरवर वापरण्यासाठी छायाचित्र फिरविण्यात (फ्लिप) आल्याने सैनिकांनी डाव्या हातात रायफल्स धरल्याचे दिसत आहे. तसेच या सैनिकांनी घातलेली हेल्मेटस आणि त्यांच्या हातात असलेली एम-१६ रायफल्सचा अमेरिकन लष्कराकडून वापर केला जातो. त्यामुळे सुरूवातीलाच या बॅनर्सकडे पाहून अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शहीद दिवसाच्या आदल्यादिवसापासूनच संपूर्ण चंदीगढ शहरात हे बॅनर्स मोठ्या संख्येने झळकत आहेत. या प्रकारावर लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, चंदीगढ महानगरपालिकेने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. ही काही छोटीशी चूक नाही. महानगरपालिकेचे प्रशासन भारतीय लष्कराप्रती किती निष्काळजी आणि त्यांच्या लेखी सैनिकांनी केलेल्या बलिदानाला काहीच महत्त्व नसल्याची बाब अधोरेखित होत असल्याची प्रतिक्रिया माजी मेजर गनित चौधरी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2015 रोजी प्रकाशित
शहीद दिनाला हुतात्म्यांचा अपमान, बॅनर्सवर भारतीय सैनिकांऐवजी अमेरिकन सैनिकांची छायाचित्रे
शहीद दिवसाच्या पार्श्वभूमीवर चंदीगढ महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या बॅनर्सवरून सध्या मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

First published on: 23-03-2015 at 11:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Martyrs day chandigarh civic body passes off us armymen as indian army soldiers in hoardings