राजकीय हत्या प्रकरणात बहुआलेख चाचणी करून घेण्यास नकार देणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळातील ज्येष्ठ नेते एमएम मणी यांना बुधवारी अटक करण्यात आली आह़े  विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास मणी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच पुन्हा सुरू झाला आह़े मणी यांचा वाचाळपणाच त्यांना भोवल्याची चर्चा आह़े
आपल्या पक्षाने इडुक्की जिल्ह्यातील शत्रूचा पूर्वीच काटा काढल्याचे जाहीर वक्तव्य मणी यांनी केले होत़े  त्यानंतर त्यांना तातडीने कुन्हीठन्नी येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले होत़े  पोलीस स्थानकात मणी यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना नेदुमकन्दन येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल़े  तेथे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़
या अटकेच्या निषेधार्थ इडुक्की जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गुरुवारी बंद पुकारला आह़े  मणी यांनी गेल्या दोन दशकांपासून पक्षाचे सरचिटणीस म्हणून याच जिल्ह्याचे काम पाहात आहेत़  इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कँाग्रेसच्या कार्यकर्त्यांची ३० वर्षांपूर्वी हत्या झाली होती़  त्या प्रकरणात मणी आणि पक्षाच्या इतर दोन कार्यकर्त्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत़  या खून खटल्यासंदर्भात मणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अधिक चौकशी होणार आह़े .   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marxist leader in lockup