नवी दिल्ली, पुणे, नागपूर : चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.

जास्तीत जास्त करोना रुग्णांचे नमुने जनुक्रीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्यमंत्री मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. देशातील २७-२८ टक्के पात्र नागरिकांनी करोनाची वर्धक मात्रा घेतली आहे, याकडे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बैठकीतील उपस्थितांचे लक्ष वेधले. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीच्या वापराचा आग्रह त्यांनी धरला.

देशात सध्या करोनाचे ३,४०८ उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचे सरासरी ५.९ लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत.

‘आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचण्या, प्रतिबंधात्मक उपाय राबवा’

चीन आणि इतर देशांत दिसणारी रुग्णवाढ ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचण्या, विलगीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय कठोरपणे राबवा, असे आवाहन राज्याचे करोना विषयक तांत्रिक सल्लागार आणि माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी केले आहे. राज्यात सध्या १३२ उपचाराधीन रुग्ण आहेत. या रुग्णांना असलेला संसर्ग प्रामुख्याने सौम्य लक्षणे दर्शवणारा असून, त्यामुळे बहुतांश रुग्ण हे घरच्या घरी आणि कमीतकमी औषधोपचारांनी बरे होत आहेत. मात्र, जगाच्या काही भागांतील वाढती रुग्णसंख्या, आंतरराष्ट्रीय प्रवासावर नसलेले निर्बंध अशा परिस्थितीत महासाथीच्या काळात राबवण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वर्तन आवश्यक आहे, याकडे डॉ. साळुंखे यांनी लक्ष वेधले.

आपण सतर्क आहोतच

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले,की भारतात सध्या आढळणारे रुग्ण हे ७५ टक्के बीए.२.७५ प्रकारचे, तर उर्वरित बहुतेक रुग्ण हे एक्सबीबी प्रकारचे आहेत. बीएफ.७ चे काही मोजके रुग्ण आपल्याकडे पूर्वी आढळले मात्र येथील लोकसंख्येला संसर्ग करण्यात त्यांना यश आलेले नाही. जनुकीय क्रमनिर्धारणाची प्रक्रिया आपण करत आहोतच. भारतातील रुग्णसंख्येत काही फरक दिसल्यास जनुकीय क्रमनिर्धारणाचा वेगही वाढवण्यात येईल, असेही डॉ. कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले.

राज्यात सक्तीबाबत आज निर्णय

नागपूर : केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने पुन्हा कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. करोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात एकही रुग्ण नसला तरी र्निबध लागू करायचे का, मुखपट्टीची पुन्हा सक्ती करायची की नाही, याबाबतचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. करोना कृती दल पुन्हा स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

‘भारत जोडो’ यात्रेवर गंडांतर?

नवी दिल्ली : भाजपच्या तीन खासदारांनी करोना प्रादुर्भावाची भीती व्यक्त केल्यानंतर, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून ‘भारत जोडो’ यात्रा स्थगित करण्याची विनंती केली. त्यास काँग्रेसने विरोध केला. दक्षिण भारताप्रमाणे उत्तरेतही यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने करोनाची भीती दाखवून केंद्र सरकार यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

चीनमधील नव्या उत्परिवर्तीत विषाणूचे भारतात तीन रुग्ण 

चीनमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्रामध्ये ऑक्टोबरमध्येच ‘बीएफ.७’चा एक रुग्ण आढळून आला. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.

भारतात लसीकरण पूर्ण झालेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत समाधानकारक आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र चीनमधील रुग्णवाढीची बातमी चिंताजनक आहे.

-आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mask again in crowded places center instructs states preventive measures against corona virus ysh