भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अझहरच्या मृत्यूवरुन कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळया बातम्या येत आहेत. एएनआयने पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने मसूद अझहर जिवंत असल्याचे म्हटले आहे. भारताने बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहरचा खात्मा झाला असे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते तर लिव्हर कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला असे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे होते.

पाकिस्तानी लष्कराने रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास मसूदला रावळपिंडी येथील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हलवले असे टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अझहरला दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर लगेचच जैशने इम्रान खान सरकारवर भारत आणि आंतरराष्ट्रीय समूहाच्या दबावासमोर झुकल्याचा आरोप केला.

मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या मसूद अझहरवर रावळपिंडी येथील लष्कराच्या रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर अझहरच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हीस ग्रुपचे १० अतिरिक्त कमांडो तैनात करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली.

अझहर जिवंत असून त्याची प्रकृती चांगली आहे. भारतीय हवाई दलाने बालकोटमधील आमच्या तळावर हल्ला केला. पण त्यात जिवीतहानी झाली नाही असे जैशकडून रविवारी सांगण्यात आले. पुलवामा हल्ल्यानंतर जैशने लगेचच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताकडून बालकोटमधील जैशच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला. या हवाई हल्ल्यात जैशचे अनेक दहशतवादी, कमांडर मारले गेले असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Story img Loader