नवी दिल्ली : लखीमपूर खेरीमधील हत्याकांडामुळे झालेल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांना हळुहळू विधानसभा निवडणुकीतील पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून मतदारांसमोर आणण्याचा खटाटोप पक्षाकडून केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी प्रियंका यांच्या कृतींवर आक्रमक टीका करून त्यांना जाणीवपूर्वक ‘राजकीय बळ’ दिले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखीमपूरमधील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी प्रियंका गांधी-वाड्रा लखनऊमध्ये इंदिरा नगरमधील दलित वस्तीतील वाल्मिकी मंदिरात गेल्या. त्यांनी त्या परिसरात हाती झाडू घेत साफसफाई केली. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, प्रियंका या झाडू चालविण्याच्या योग्यतेच्या असल्याची टीका केली. योगींच्या टीकेमुळे प्रियंका यांची स्वच्छता मोहीम हा राजकीय मुद्दा बनला असून काँग्रेसनेही योगींना प्रत्युत्तर दिले.  झाडू हातात घेणे हे कनिष्ट दर्जाचे काम नाही. योगींनी जातीयवादी टीका केली असून महिला व दलित समाजाचा अपमान केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

 रविवारी, लखीमपूरला जाताना सीतापूर येथे पोलिसांनी  प्रियंका यांना अटक केली होती. त्यानंतर रात्री प्रियंका यांनी झाडलोट करून खोली स्वच्छ केली होती. रविवार तसेच, शुक्रवार या दोन्ही दिवसांतील प्रियंकांच्या स्वच्छता मोहिमेची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत काँग्रेसने प्रसारित केली आहे.

प्रशांत किशोर यांचा सबुरीचा सल्ला

काँग्रेसच्या या आक्रमक धोरणाबाबत निवडणूक आखणीकार प्रशांत किशोर यांनी राहुल व प्रियंका यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. लखीमपूर हत्यांकाडाचा वापर करून अल्पावधीत काँग्रेस पुन्हा मजबूत करून पक्ष उभा करता येईल असे कोणाला वाटत असेल तर त्यांच्या पदरी निराशाच येईल. खोलवर रुतलेल्या प्रश्नांवर इतक्या सहजासहजी मात करता येणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा केली जात होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massacre in lakhimpur kheri political developments priyanka gandhi akp